Join us

‘बाजीराव मस्तानी’साठी केली तपश्चर्या: संजय लीला भन्साळी

By admin | Published: January 01, 2016 4:16 AM

चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘बाजीराव मस्तानी’वर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. सोशल मीडियावर तर एकीकडे टीकेचा तर दुसरीकडे समर्थनाचा अक्षरश: पाऊस पडला

चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘बाजीराव मस्तानी’वर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. सोशल मीडियावर तर एकीकडे टीकेचा तर दुसरीकडे समर्थनाचा अक्षरश: पाऊस पडला होता. मात्र, भन्साळींनी या टीकेला काहीही प्रत्युत्तर दिले नव्हते. ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपट बनवण्याचं पाहिलेलं स्वप्न तब्बल एका तपानंतर सत्यात उतरलं आणि प्रेक्षकांनी जितक्या प्रमाणात टीका केली होती, त्यापेक्षाही जास्त आपली पसंती या चित्रपटाला दिली. याबद्दल संजय सांगतात, ‘हा प्रतिसाद पाहून आता वाटतंय, माझी १२ वर्षांची तपश्चर्या पूर्ण झाली आहे. बारा वर्षांपूर्वी जे स्वप्न पाहिलं, त्यासाठी गेलं एक तप वेड्यासारखा झपाटून गेलो होतो, पण माझा प्रामाणिकपणा, माझी बाजीरावांशी असलेली निष्ठा लोकांना कळली, म्हणूनच आज चित्रपट पाहायला गर्दी होत आहे. माझ्या कामाचं चीज झालं आहे. एवढं प्रेम मला कोणत्याच चित्रपटाने दिलं नव्हतं.’ इतकेच नाही, तर आता भन्साळींना पुरस्कार दिला पाहिजे, अशीही भाषा ते करू लागले आहेत.