संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या 'हीरामंडी' (Heeramandi) सीरिजची सध्या सर्वत्र चर्चा आहे. पाकिस्तानच्या हीरामंडी येथील वेश्यांवर कहाणी आधारित आहे. सहा अभिनेत्रींनी यात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, आदिती राव हैदरी, शरमिन सहगल, रिचा चड्डा आणि संजीदा शेख यांचा यात समावेश आहे. अनेकांनी सीरिज पाहिली असून यातील एक मोठी चूक आता समोर आली आहे. नेटकऱ्यांनी संजय लीला भन्साळींच्या या मास्टरपीसमध्ये चूक शोधून काढली आहे.
'हीरामंडी'ची कहाणी स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे. यातील एका सीनमध्ये सोनाक्षी सिन्हा जी 'फरीदन' या भूमिकेत आहे ती उर्दू वर्तमानपत्र वाचत असते. यामध्ये कोरोना व्हायरस आणि वारंगल नगर निवडणूकसह काँग्रेस मास्क वितरण योजना सारख्या तीन वर्षांपूर्वीच्या घडामोडी लिहिलेल्या आहेत.तसंच हे वर्तमानपत्र 1920 नाही तर नवीन प्रिंटचं दिसत आहे. याशिवाय एका सीनमध्ये आदिती राव हैदरी एका लायब्ररीमध्ये जाते. तिथे पीर-ए-कामिल हे पुस्तक असतं. हे पुस्तक खरंतर 2004 मध्ये प्रकाशित झालं आहे.
'हीरामंडी' सीरिज 1 मे पासून नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे. आता हळूहळू सीरिजमधील चुका समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेता शीजान खाननेही कलाकारांच्या उर्दू डायलॉग्सवर आक्षेप घेतला होता. फरीदा जलाल यांना सोडून इतर कोणीच उर्दू नीट म्हटलेलं दिसत नाही असं म्हणत त्याने नाराजी व्यक्त केली होती. संजय लीला भन्साळींनी सेट, कॉस्च्युम यावर प्रचंड मेहनत घेतली पण या चुका त्यांच्या लक्षात आल्या नाहीत असं दिसत आहे.