ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड दबंग सलमान खान जुनं भांडण विसरुन पुन्हा एकदा दिग्दर्शक संजय लिला भन्साळीसोबत काम करणार असल्याच्या बातम्या येत्या होत्या. सलमान खान भन्साळींचा एक मोठा प्रोजेक्ट साईन करत असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र यासंबंधी अधिकृतपणे कोणतीही माहिती मिळाली नव्हती. पण अखेर दोघंही तब्बल 10 वर्षानंतर एकत्र काम करणार हे नक्की झालं आहे.
सलमान खानने आपण संजय लिला भन्साळींसोबत एका प्रोजक्टसाठी चर्चा करत असल्याचं मान्य केलं होतं. मात्र यावर संजय लिला भन्साळींनी यावर कोणतंही भाष्य केलं नव्हतं. पण शेवटी संजय लिला भन्साळी यांनी आपण सलमानसोबत काम करत असल्याचं मान्य केलं आहे. यानिमित्ताने सलमान खान आणि संजय लिला भन्साळी तब्बल 10 वर्षांनी एकत्र येणार आहेत.
संजय लिला भन्साळी यांनी इन्स्टाग्रामवर सलमानसोबतचा एक जुना फोटो पोस्ट केला आहे. "आम्ही पुन्हा एकत्र येत आहोत. 10 वर्षांनी रियुनिअन", असंही त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
सलमान खान आणि संजय लिला भन्साळी यांनी रणबीर कपूर आणि सोनम कपूरचा डेब्यू चित्रपट "सावरिया"मध्ये एकत्र काम केलं होतं. हा त्यांचा एकत्र काम केलेला शेवटचा चित्रपट होता.