अखेर संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेला ‘संजू’ हा सिनेमा आज रिलीज झाला. पण हे काय? इकडे चित्रपटगृहांत प्रदर्शित होत नाही तोच हा चित्रपट इंटरनेटवर लीकही झाला. होय, सोशल मीडियावर हा चित्रपट लीक झाल्याचे संदेश फिरत आहेत. ‘संजू’ लीक झाला आणि तोही एचडी क्वालिटीमध्ये, असे मॅसेज वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झालेत. साहजिकच चित्रपट आॅनलाईन लीक झाल्याने मेकर्सचे धाबे दणाणले. ‘संजू’चा लीड अॅक्टर यानंतर लगेच समोर आला आणि त्याने आपल्या चाहत्यांना आॅनलाईन लीक झालेला चित्रपट डाऊनलोड न करण्याचे व पायरसी न वाढवण्याचे आवाहन केले. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, ‘संजू’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि त्याचवेळी आॅनलाईन लीक झाला. या लीकमुळे साहजिकचं ‘संजू’च्या बिझनेसवर परिणाम होण्याचा धोका वाढला आहे.तूर्तास सोशल मीडियावर या लीक प्रकरणावरून मॅसेजचा पूर आला आहे. रणबीरचे चाहते, पायरसीला प्रोत्साहन न देण्याचे आवाहन करताहे तर काहींनी यानिमित्ताने सेन्सॉर बोर्डाला धारेवर धरले आहे. सेन्सॉर बोर्डाला चित्रपटातील टॉयलेट लिकेजच्या सीनवर आक्षेप आहे. पण चित्रपट लीक झाल्याबद्दल काहीही अडचण नाही, असे एका युजरने लिहिले आहे.
खरे तर चित्रपट लीक होण्याचे प्रमाण अलीकडे बरेच वाढले आहे. चित्रपट लीक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘काला’ लीक झाल्याची खबर होती. हा चित्रपट तामिळ वेबसाईट ‘तमिलरॉकर्स’वर प्रदर्शनाच्या एक दिवसापूर्वीच लीक झाला होता. रजनीकांतच्या जगभरातील चाहत्यांनी याची निंदा केली होती.तूर्तास ‘संजू’च्या बॉक्सआॅफिस ओपनिंगवर वेगवेगळे ट्रेड एक्स्पर्ट भाष्य करताना दिसत आहेत. त्यांच्यानुसार, पुढील तीन दिवसांत हा चित्रपट १०० कोटींचा बिझनेस करण्याची शक्यता आहे. या चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहे. त्याच्याशिवाय परेश रावल, मनिषा कोईराला, सोनम कपूर, दीया मिर्झा, विकी कौशल, अनुष्का शर्मा हेही या चित्रपटात आहेत.