बॉलिवूडचा अभिनेता संजय दत्तच्या जीवनावरील चित्रपट संजू चित्रपट पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती आणि या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. यातील प्रत्येक भूमिकेचे कौतुक झाले. संजय दत्तची भूमिका साकारणारा अभिनेता रणबीर कपूरच्या अभिनयही प्रेक्षकांना खूप भावला. या चित्रपटाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या ५ चित्रपटांच्या यादीतही स्थान मिळवले आहे. आता टॉप ४ मध्ये येण्यासाठी या चित्रपटाची सलमान खानच्या 'टायगर जिंदा है' या चित्रपटाशी टक्कर असणार आहे.
प्रदर्शनानंतर ३ आठवड्यात संजू चित्रपटाने ३२०.८० कोटींचा गल्ला जमवल्याने हिंदी सिनेसृष्टीतील ५ सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत 'संजू'चा समावेश झाला होता. आता या चित्रपटाची कमाई ३३३.५५ कोटी एवढी झाली आहे. सलमानच्या 'टायगर जिंदा है' चित्रपटाने ३३९.१६ कोटी एवढी कमाई केली होती. या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडून टॉप ४ मध्ये स्थान मिळवण्यात संजूला केवळ ६ कोटींची गरज आहे. ३ आठवड्यांनंरही चित्रपटाला मिळणाऱ्या प्रेक्षकांच्या प्रतिसादावरून लवकरच हा चित्रपट टॉप ४ मध्ये स्थान मिळवणार असल्याचे दिसते आहे. ‘संजू’नंतर आता आपल्याला संजय दत्तची कहाणी त्याच्याच शब्दांत वाचायला मिळणार आहे. होय, संजय दत्तने आत्मचरित्र लिहिण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षी संजयच्या वाढदिवसाला म्हणजे २९ जुलैला या आत्मचरित्राचे प्रकाशन होणार आहे. हार्पर कॉलिन्स प्रकाशित करणार असलेल्या या आत्मचरित्रात संजयच्या अभिनय क्षेत्रातील उपलब्धींसोबतचं त्याच्या आयुष्यातील अनेक चढ-उतार असतील. तूर्तास या आत्मचरित्राचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. पण या पुस्तकाची घोषणा मात्र झाली आहे.‘संजू’ हा रणबीरच्या करिअरमधील सर्वात मोठा चित्रपट ठरण्याची शक्यता आहे. कारण हा चित्रपट रणबीरच्या आत्तापर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.