नाटकावर प्रचंड प्रेम असणारे मोजकेच कलाकार सध्या दिसून येतात. मालिका, चित्रपट मिळाले की हे कलाकार नाटकाकडे पाठ फिरवतात. पण अभिनेता संकर्षण कऱ्हाडेचं (Sankarshan Karhade) नाटकावरील प्रेम वेळावेळी दिसून आलंय. अर्थात प्रशांत दामलेंच्या (Prashant Damle) मार्गदर्शनाखाली त्याची तालीम झाली आहे. प्रशांत दामलेंसारखंच संकर्षणमध्येही नाटक भिनलं आहे. नुकतीच संकर्षणने तिकीट खरेदीसाठी प्रेक्षकांची गर्दी असलेला एक फोटो शेअर करत छान कॅप्शनही दिलं आहे.
संकर्षण सध्या 'तू म्हणशील तसं' आणि 'नियम व अटी लागू' या दोन्ही नाटकांत व्यस्त आहे. जगभरात नाटकाचे जोरदार प्रयोग सुरु आहेत. प्रेक्षकांमध्येही नाटक पाहण्याचा उत्साह काही कमी नाही. याचाच प्रत्यय संकर्षणला आलाय. तिकीट खिडकीवर असलेली रसिकांची रांग बघून संकर्षणने फोटो शेअर करत लिहिले,'कोण म्हणतं नाटकाला गर्दी होत नाही… ?? आणि ही गर्दी नाही, ही आहे ‘दाद’ दर्दी रसिकांची…ही आहे शिस्तप्रिय “ईचलकरंजीकरांनी” लावलेली रांग - महाराष्ट्रभर तुफान चाललेल्या ‘नियम व अटी लागू’ या खुसखूशीत नाटकाच्या तिकिट बुकिंगसाठी…'
'तू म्हणशील तसं' आणि 'नियम व अटी लागू' ही दोन्ही नाटकं संकर्षणने लिहिली आहेत. तर प्रशांत दामलेंनी निर्मिती केली आहे. सध्या ही दोन्ही नाटकं रंगभूमीवर धुमाकूळ घालत आहेत. तिकीट खिडकीवर रसिकांची होत असलेली गर्दी हेच सांगून जातेय.