मराठीतील ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं यांचं सोमवारी(१४ ऑक्टोबर) निधन झालं. ५७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही वर्षांपासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. यातून ते पूर्णपणे बरेदेखील झाले होते. परंतु, काही दिवसांपूर्वी तब्येत बरी नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर त्यांची कॅन्सरशी झुंज संपली. अतुल परचुरे यांच्या निधनाने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी(१६ ऑक्टोबर) अंत्यसंस्कार करण्यात आले. संकर्षण कऱ्हाडेने पोस्टमधून अतुल परचुरेंच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट
अर्थपूर्ण बोलणारे अतुल सर!!! कायम लक्षात राहातील 😔
मी त्यांच्यासोबत कधीच काम केलं नाही , पण त्यांची काही वाक्यं आणि त्या वाक्यांमुळे “अतुल परचुरे सर” जन्मभर लक्षात राहातील...
प्रसंग १ : लॉकडाऊन मध्ये मला त्यांचा फोन आला; “काय रे बरायेस का ? काहीही लागलं तर मला सांग...मी म्हणालो असं का म्हणताय? तर म्हणाले “अरे आम्ही इथेच जन्माला येतो , इथेच काम करतो, आमचं घर आहे!तू मुंबईबाहेरून आलायेस, सध्या सगळं बंद असल्यामुळे घर, कुटुंब चालवायला अडचण येऊ शकते. काही वाटलं तर मुंबईत अतुल आहे हे लक्षात ठेव...
प्रसंग २ : 'तू म्हणशील तसं'च्या २२७व्या प्रयोगाला 'शिवाजी मंदिर, दादर'ला प्रयोग पहायला आले...
मी म्हणालो , “सर , माझ्या कामाच्या बाबतीत, लिखाणाच्या बाबतीत काही सुचना करायच्या असतील तर प्लिज सांगा …”तर म्हणाले , “२२७ प्रयोग प्रेक्षक नाटकाला आलेत ना... मग आता मी सूचना केल्या तर मी मुर्ख ठरेन. त्यामुळे आता मीच काय कुणीही काहीही येऊन सुचना केली तरी ऐकू नको. प्रयोग करत राहा!!!"
प्रसंग ३ : मध्यंतरी मी दौऱ्यावर होतो म्हणुन ड्रामा जूनियर्स कार्यक्रमांत परिक्षक म्हणुन अतुल सर गेले होते...तर मला फोन करुन म्हणाले“आज माझं भाग्यं , मी तुझी रिप्लेसमेंट करून आलो”
प्रसंग शेवटचा : यशवंत नाट्यसंकूल , माटुंगाच्या शुभारंभाचा वेळी भेटले...मी म्हणालो आता बरे आहात का? त्यावर त्यांचं उत्तर..“मी आता डोक्यातून आजार काढून टाकला आहे. त्यामुळे तुझ्या नाटकांत काम करण्याइतका बरा आहे ”
ह्या बोलण्याचा , मैत्री जपण्याचा आणि त्यांच्या अंगी असलेल्या अनेक गोष्टींचा मी फॅन होतो आहे आणि राहीन...बाय बाय अतुल सर...
अतुल परचुरे रंगभूमीवर रमणारे अभिनेते होते. 'तरुण तुर्क म्हातारे अर्क', 'प्रियतमा', 'वासूची सासू', 'आम्ही आणि आमचे बाप' या नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारली. शिवाय 'आर के लक्ष्मण की दुनिया', 'जागो मोहन प्यारे' सारख्या हलक्याफुलक्या मालिकेत काम केलं. त्यांनी पु. ल. देशपांडे यांच्या समोर त्यांचीच व्यक्तिरेखा 'व्यक्ती आणि वल्ली' या नाटकात अत्यंत उत्तम पद्धतीने साकारली. कपिल शर्मा शोमध्येही त्यांनी सर्वांना खळखळून हसवलं. आता ते पुन्हा 'सूर्याची पिल्ले' या नाटकातून दमदार कमबॅक करणार होते. मात्र त्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी आहे.