"सारं काही तिच्यासाठी" मालिकेचा पहिल्या प्रोमोपासूनच ह्या मालिकेची चर्चा होताना दिसतेय कारण आहे तगडी कलाकारांची फौज आणि ह्या मालिकेचं संगीत. ही कथा आहे २ सख्ख्या बहिणींची ज्या गेले २० वर्ष एकमेकींना भेटल्या नाहीत. मोठी बहीण उमा तळकोकणात आपल्या सासरी सुखाने नांदतेय आणि लहान बहीण संध्या तिच्या मुली सोबत गेले २० वर्ष लंडनमध्ये स्थायिक आहे. दोघींच्या आयुष्यात २० वर्षांपूर्वी एक अशी घटना घडली ज्यामुळे त्या एकमेकींना कायमच्या दुरावल्या. पण म्हणतात ना रक्ताची नाती कितीही लांब गेली तरी मनातला जिव्हाळा कमी होत नाही. मैलोनमैल लांब असून सुद्धा त्याची नाळ एकमेकींशी जोडली आहे.
'या मालिकेच्या प्रोमोशनच्या निमित्ताने एक सुंदर गोष्ट घडली ती म्हणजे मालिकेत उमा आपल्या बहिणीशी म्हणजेच संध्याशी पत्राद्वारे संवाद साधण्याचा प्रयत्न करते पण ते पत्र संध्या पर्यंत कधीच पोहोचू शकलं नाही. त्याला कारण २० वर्षांपूर्वी रघुनाथरावांना दिलेलं वचन. आताच्या मोबाईल आणि इंटरनेट युगात एकमेकांना पत्र लिहिण्याचं आपण सगळेच विसरून गेलोय, पण या मालिकेच्या निमित्ताने खुशबू ने उपस्थित महिलांना आपल्या बहिणीशी आपल्या मनातल्या गोष्टी ज्या काही कारणास्तव व्यक्त करू शकल्या नसतील त्या पत्राद्वारे व्यक्त करण्याचा टास्क दिला. मुंबई, सोलापूर, सांगली, अमरावती येथे झालेल्या कार्यक्रमात जवळपास ४००० महिला पत्राद्वारे आपल्या बहिणीशी व्यक्त झाल्या.
काहींनी तर आम्ही हे कदाचित कधीच बोलू शकलो नसतो पण तुमच्या या मालिकेच्या निमित्ताने मनातल्या गोष्टी पत्राद्वारे सांगता आल्या म्हणून या मालिकेचे आभार देखील मानले.