Join us

'सैराट'ची बॉक्स ऑफिसवर सुसाट धाव, 11 दिवसांत 41 कोटींची कमाई

By admin | Published: May 11, 2016 8:33 AM

'सैराट'ने बॉक्स ऑफिसवर 11 दिवसांमध्ये तब्ब्ल 41 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे 'सैराट' मराठीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे

ऑनलाइन लोकमत - 

मुंबई, दि, 11 - 'सैराट' चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरक्षा 'याड लावलं' आहे. दोन आठवड्यानंतरही चित्रपट हाऊसफुल्ल जात आहे. नागराज मंजुळेंनी दिग्दर्शित केलेल्या या मराठी चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. 'सैराट'ने बॉक्स ऑफिसवर 11 दिवसांमध्ये तब्ब्ल 41 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे 'सैराट' मराठीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. सर्वाधिक कमाईचा रेकॉर्ड करणा-या 'नटसम्राट'लाही 'सैराट'ने मागे टाकलं आहे. 
 
अभिनेत्री रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची दाद मिळत आहे. लव्ह स्टोरी असणा-या या चित्रपटात मनोरंजनासोबत असणारा सामाजिक संदेशही प्रेक्षकांना भावतो आहे. ‘सैराट’ने पहिल्या आठवड्यात 25 कोटींचा टप्पा पार केला होता. महत्त्वाचं म्हणजे पहिल्या विकेंडला म्हणजेच शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवसात तब्बल 12.20 कोटींचा गल्ला 'सैराट'ने जमवला होता.
 
‘सैराट’ने पहिल्या आठवड्यातील शुक्रवारी 3.55 कोटी, शनिवारी 3.80 कोटी आणि रविवारी 4.85 कोटी आणि सोमवारी 2.90 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे अवघ्या चार दिवसात सैराटची कमाई 15.10 कोटी रुपयांवर गेली. महत्वाचं म्हणजे चित्रपटाची सेन्सॉर कॉपी लिक झाल्याने याचा परिणाम कमाईवर झाला आहे. कॉपी लिक झाली नसती तर कदाचित कमाईचा आकडा वाढून नवा विक्रम झाला असता.
‘नटसम्राट’ने एका आठवड्यात 16 कोटी 50 लाख रुपयांची कमाई केली होती. चौथ्या आठवड्यात हा आकडा 35 कोटींच्या घरात गेला होता. मात्र हा सैराटने हा विक्रम 10 दिवसांमध्येच केला आहे. दुसरीकडे ‘कट्यार काळजात घुसली’ या सिनेमाने पहिल्या आठवड्यात 7 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ने चार दिवसात 12.70 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.
 
मराठी चित्रपटांची कमाई - 
- दुनियादारी : 26 कोटी
- टाईमपास – 32 कोटी
- टाईमपास 2 – 28 कोटी
- लय भारी – 38 कोटी
- नटसम्राट – 40 कोटी
- कट्यार काळजात घुसली – 31 कोटी