भाबीजी घर पर है (Bhabiji Ghar Par Hai) या मालिकेत मलखानची भूमिका साकारणारा अभिनेता दीपेश भानचे नुकतेच वयाच्या ४१ व्या वर्षी निधन झाले. तरुण अभिनेत्याच्या मृत्यूच्या बातमीने चाहते अजूनही स्तब्ध आहेत आणि त्याच दरम्यान आणखी एका अभिनेत्याच्या मृत्यूची बातमी आली आहे. या अभिनेत्याचे वयाच्या ३७ व्या वर्षी निधन झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, केरळमधील युवा अभिनेता सरथ चंद्रन(Sarath Chandran)चे वयाच्या ३७ व्या वर्षी शुक्रवारी निधन झाले. 'अंगमली डायरीज' या चित्रपटासाठी तो प्रसिद्ध होता. सरथ चंद्रन हा मल्याळम भाषेतील अभिनेता होता. 'अंगमली डायरीज', 'कुडे', 'ओरू मेक्सिकन अपराथा' हे त्याचे लोकप्रिय चित्रपट आहेत.
सरथ चंद्रनच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा देत अभिनेता अँटोनी वर्गीस यांनी अंगमली डायरीज मधील सरथ चंद्रनचा फोटो शेअर केला आणि RIP ब्रदर असे लिहिले. मूळचा कोचीचा असलेल्या सरथ चंद्रनने यापूर्वी एका आयटी फर्ममध्ये काम केले होते आणि डबिंग कलाकार म्हणून चित्रपटांमध्येही काम केले होते. त्याने मल्याळम चित्रपटसृष्टीत अनिस्या चित्रपटाद्वारे पदार्पण केले. अभिनेता सरथ चंद्रनचे निधन कशामुळे झाले हे अद्याप समजू शकलेले नाही, मात्र या वृत्ताने सिनेजगतावर शोककळा पसरली आहे. सरथच्या चाहत्यांना दु:ख झाले आहे. अनेक अभिनेते आणि त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.
२०२२ मध्ये अनेक दिग्गज स्टार्सनी या जगाचा निरोप घेतला. लता मंगेशकर, दीपेश भान, बप्पी लाहिरी, गायक केके आणि सिद्धू मुसेवाला या कलाकारांच्या निधनाच्या वृत्ताच्या धक्कातून चाहते अद्याप सावरले नाहीत. त्यात आता सरथ चंद्रनच्या जाण्याने चाहत्यांचे मन आणखीनच अस्वस्थ झाले आहे.