बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन पासून ते सनी देओलपर्यंत सर्वांनाच आपल्या तालावर नाचवणाऱ्या कोरिओग्राफर सरोज खान (Saroj Khan) यांना कोण ओळखत नाही. माधुरी दीक्षितच्या आयकॉनिक 'एक दो तीन' गाण्याचं नृत्यदिग्दर्शन सरोज खान यांनीच केलं होतं. तर सनी देओलसारख्या नॉन डान्सर्सनाही त्यांनी नाचायला भाग पाडलं. पण तुम्हाला माहितीए का सर्वांच्या आवडत्या नृत्यदिग्दर्शिका सरोज खान आणि सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) यांचं कडाक्याचं भांडण झालं होतं.
होय. 'अंदाज अपना अपना' सिनेमावेळी सलमान खान आणि सरोज खान यांच्यात एका गोष्टीवरुन वाद झाला होता. ते नेमकं काय भांडण होतं याचा खुलासा स्वत: सरोज खान यांनीच एका मुलाखतीत केला होता. त्या म्हणाल्या, "अंदाज अपना अपनामध्ये एका गाण्याची कोरिओग्राफी करत असताना सलमान खान मला शिव्या देऊ लागला. आमिर खानला मी सगळ्या स्टारवाल्या स्टेप्स देत आहे आणि त्याला फक्त ढोल हातता देऊन उभं केलं आहे असा त्याचा आरोप होता. तेव्हा मी त्याला म्हणाले मी दिग्दर्शकाने जसं सांगितलंय तसं करत आहे. तुला वाईट वाटलं असेल तर माफ कर. तुला माझ्याबरोबर काम नसेल करायचं तर नको करु. कारण मला भाकरी अल्ला देतो...तू नाही."
या भांडणानंतर सलमान खानने सरोज खान यांच्यासोबत कधीच काम केलं नाही. नंतर काही वर्षांनी सलमान सुपरस्टार झाला तेव्हा सरोज खान यांना काम मिळणं कमी झालं होतं. तेव्हा सलमान खाननेच त्यांना कामं मिळवून दिली होती."
सलमान खानचा इंडस्ट्रीत चांगलाच दबदबा आहे. त्याने अनेकांची मदतही केली आहे तर काहींनी त्याच्याशी पंगाही घेतला आहे. जो सलमानशी पंगा घेतो त्याचं करिअर संपतं अशीही नेहमी चर्चा असते. अर्थात मनोरंजनसृष्टीत काय खरं आणि काय खोटं हे सांगता येत नाही.