Satish Kaushik Death: बॉलिवूड अभिनेते दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. ९ मार्च रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. मृत्यूपूर्वी ते दिल्लीत त्यांचे मित्र आणि व्यापारी विकास मालू यांच्या फार्महाऊसवर होते. दुसरीकडे, विकासची पत्नी सानवीने पतीवर सतीश यांची हत्या केल्याचा आरोप केला आहे. सानवीने पतीवर आरोप केल्यानंतर या प्रकरणाचा नवा अँगल समोर आला आहे. त्याचबरोबर दिल्लीपोलिसही अँक्शन मोडमध्ये असून कारवाई करताना दिसत आहेत. आज तपासादरम्यान गुंतलेले दिल्ली पोलीस विकास मनूच्या फार्म हाऊसवर पोहोचले.
पोलिसांनी कर्मचाऱ्यांची केली चौकशी
सतीश कौशिक यांनी फार्म हाऊसवर आयोजित केलेल्या पार्टीला हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे, तेथे पोहोचल्यानंतर पोलिसांनी त्या दिवशी फार्म हाऊसवर उपस्थित असलेले कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांची चौकशी केली. त्यासोबतच त्या पार्टीत कोण आले होते हे पाहण्यासाठी पोलिसांनी गार्ड रूमचे एंट्री रजिस्टरही तपासले आहे.
सतीश यांच्या पत्नीने सान्वीचे आरोप निराधार असल्याचे सांगितले...
सानवीने आपल्या पतीविरोधात म्हटले आहे की, तिच्या पतीने सतीश यांच्याकडून १५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते आणि हे पैसे परत करायला लागू नयेत म्हणून कदाचित त्यानेच सतीशची हत्या केल्याची शक्यता आहे. मात्र, यावर आपले स्पष्टीकरण देताना विकासने आपल्या नावाची बदनामी केली जात असल्याचे सांगितले. सतीश हे ३० वर्षे त्यांच्या कुटुंबासारखे होते आणि ते त्यांच्या कायम आठवणीत राहतील, असे विकास म्हणाला.
दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना सतीश यांची पत्नी शशी हिने विकास यांच्यावरील हे आरोप निराधार असल्याचे म्हटले. सतीश आणि ते खूप चांगले मित्र असल्याचे त्यांच्या बाजूने सांगण्यात आले. विकास पैशासाठी कोणाचीही हत्या करू शकत नाही. सावकारी कर्जाचे प्रकरणही त्यांनी फेटाळून लावले. तिचे पती दिल्लीत होळीसाठी उपस्थित होते, असे तिचे म्हणणे आहे. मात्र, आता पोलिसांच्या तपासात काय समोर येते हे पाहावे लागेल. मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले आहे.