Satish Kaushik : बॉलिवूड अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. केवळ ६६ व्या वर्षी त्यांनी आयुष्यातून एक्झिट घेतली. सतीश कौशिक यांचं सिनेमांवर प्रचंड प्रेम होतं. सिनेमात काम करणं, दिग्दर्शन करणं त्यांना प्रचंड आवडत होतं. मात्र त्यांना वाढत्या वजनामुळे नेहमी त्रास व्हायचा. या कारणाने सतीश कौशिक यांनी फिटनेसकडे लक्ष द्यायला सुरुवात केली होती. मात्र तरी त्यांच्यावर काळाने घाला घातला.
सतीश कौशिक यांनी मधल्या काळात तब्बल २५ किलो वजन कमी केलं होतं. त्यांनी आहारात साखर खाणे पूर्णपणे बंद केले होते. तसेच ते जिममध्ये जाऊन वर्कआऊटही करत होते. त्यांचा वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
त्यांनी या व्हिडिओला कॅप्शन देत लिहिले, 'मला माहितीए मेहनतीचे फळ मिळते. स्वत:वर प्रेम करणं हेच माझं यावर्षीचं ध्येय आहे.' २०२३ या वर्षात फीट राहायचा संकल्प केला होता आणि ते नियमित जिमला जायचे. त्यांनी सोशल मीडियावर जिममधील असे अनेक व्हिडिओही पोस्ट केले आहेत. मात्र त्यांचा हा संकल्प अपूर्णच राहिला.
'कागज ते कर्ज' सिनेमात हिरो बदलत होते पण... सर्वांवर भारी पडायचे अभिनेता सतीश कौशिक
सतीश कौशिक हे अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, कॉमेडियन आणि पटकथालेखक होते. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया इथून त्यांनी अभिनयाचे धडे घेतले. सतीश कौशिक यांनी रंगभूमीवरून करिअरची सुरुवात केली होती. ‘मिस्टर इंडिया’, ‘दिवाना मस्ताना’, ‘ब्रिक लेन’, ‘साजन चले ससुराल’ यांसारख्या बऱ्याच चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. तर ‘रुप की रानी चोरों का राजा’, ‘प्रेम’, ‘हम आपके दिल मे रहते है’, ‘तेरे नाम’ यांसारख्या चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शन केलं.