अभिनेते व दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्या निधनाच्या वृत्ताने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. आपल्या फिल्मी करिअरमध्ये सतीश कौशिक यांनी दीड डझनावर सिनेमांचं दिग्दर्शन केलं. १०० पेक्षा अधिक चित्रपटात काम केलं. हरहुन्नरी सतीश कौशिक यांनी करिअरच्या सुरूवातीला मंडी या सिनेमात काम केलं होतं. श्याम बेनेगल (Shyam Benegal ) या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. या सिनेमातील सतीश कौशिक यांच्या कास्टिंगची कहाणी फारच इंटरेस्टिंग आहे.
सतीश कौशिक यांनी १९८३ साली आपल्या करिअरची सुरवात केली होती. विकिपीडियानुसार, पहिल्याच वर्षी त्यांनी चार सिनेमांत काम केलं होतं. १९८३ साली मंडी नावाचा सिनेमा आला होता. या चित्रपटात त्यांनी काऊंसलरची भूमिका साकारली होती. ही भूमिका कशी मिळाली, याचा किस्सा खुद्द सतीश यांनी एका द कपिल शर्मा शोमध्ये सांगितला होता.
त्यांनी सांगितलं होतं की, मी माझ्या लुक्समुळे फारच चिंतीत असायचो. माझ्या दिसण्याबद्दल माझ्या मनात न्यूनगंड होता. एकदा मला श्याम बेनेगल यांचा फोन आला. त्यावेळी मी जास्तच चिंतेत होतो. कारण मला किडनी स्टोनबद्दल कळलं होतं. त्याचा एक्स रे रिपोर्ट घेऊन रूग्णालयातून परतत असतानाच श्याम बेनेगल यांचा फोन आला. त्यांनी मला माझा फोटो मागवला. माझ्याकडे फोटो नव्हता आणि फोटो पाहिल्यानंतर हे मला अजिबात काम देणार नाही, याची मला खात्री होती. मी फोनवर त्यांना काय सांगणार होतो, मी थोडं वातावरण बदलण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडे सध्या तरी माझे फोटो नाहीत. पण हो एक्स रे रिपोर्ट आहे, मी आतून फार चांगला माणूस आहे, असं मी त्यांना म्हणालो. यावर श्याम बेनेगल जोरजोरात हसू लागले आणि त्याचक्षणी तुला मी मंडीमध्ये घेतोय, असं त्यांनी मला सांगितलं.
सतीश कौशिक यांनी १९८५ साली शशी यांच्याशी विवाह केला होता. १९९६ मध्ये कौशिक यांच्या दोन वर्षाच्या मुलाचं निधन झालं. त्यानंतर ५६व्या वर्षी सरोगसीच्या मदतीने ते पुन्हा वडील झाले. त्यांच्यामागे पत्नी व ११ वर्षांची मुलगी वंशिका असा परिवार आहे. ‘रूप की रानी’ चोरों का राजा, ‘प्रेम’, ‘हम आपके दिल में रहते है’ आणि ‘तेरे नाम’ यासारखे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. ‘मिस्टर इंडिया’, ‘दीवाना मस्ताना’, ‘साजन चले ससुराल’सह या चित्रपटांतील त्यांनी साकारलेल्या भूमिका गाजल्या.