Satish Kaushik : आज सर्वांचं कॅलेंडर हरवलं आहे. मिस्टर इंडिया सिनेमात कॅलेंडरची भूमिका अजरामर ठरली. ते कलाकार अभिनेते सतीश कौशिक यांचं आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. सतीश कौशिक यांचं सिनेमावर प्रचंड प्रेम होतं. अभिनयासोबतच त्यांना दिग्दर्शनात रस होता. त्यांनी अनेक हिट सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. पण त्यांचा एक बिग बजेट सिनेमा फ्लॉप झाला आणि त्यांना आत्महत्या करण्याचा विचार आला होता.
सतीश कौशिक म्हणजे दिलखुलास आणि हसतमुख असं व्यक्तिमत्व होतं. पण प्रत्येकाच्याच आयुष्यात अपयशही येतंच. कधीकधी त्या अपयशाचा फटका इतका बसतो की मनात वाईट विचार येतात. असंच काहीसं सतीश कौशिक यांच्यासोबतही झालं होतं. १९९३ साली त्यांनी 'रुप की रानी चोरो का राजा' सिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं. या सिनेमात श्रीदेवी आणि अनिल कपूर यांची जोडी होती तर बोनी कपूर यांनी चित्रपटाची निर्मिती केली होती.
हा त्याकाळचा सर्वात महागडा सिनेमा होता. तब्बल ९ कोटींच्या बजेटमध्ये सिनेमाची निर्मिती करण्यात आली होती. मात्र सिनेमा जोरदार आपटला. असं म्हणतात बोनी कपूर कर्जात गेले होते. दिग्दर्शनाची सार्वजनिक जबाबदारी सतीश कौशिक यांनी घेतली होती. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की ते किती दु:खी झाले होते की त्यांना आत्महत्येचे विचार येत होते. इतकी मोठी फिल्म जी बनवायलाच एवढा वेळ लागला आणि स्टारकास्टही दमदारही होती. तरी सिनेमा फ्लॉप झाला. सिनेमातील एका सीनमध्ये ट्रेनमधून हिरा चोरी करायचा होता जे शूट करायलाच ५ कोटी खर्च आला होता.
'नववर्षात फिट राहण्याचा केला होता संकल्प मात्र त्याआधीच...', सतीश कौशिक यांचा जिममधील Video व्हायरलसतीश कौशिक हे अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, कॉमेडियन आणि पटकथालेखक होते. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया इथून त्यांनी अभिनयाचे धडे घेतले. सतीश कौशिक यांनी रंगभूमीवरून करिअरची सुरुवात केली होती. ‘मिस्टर इंडिया’, ‘दिवाना मस्ताना’, ‘ब्रिक लेन’, ‘साजन चले ससुराल’ यांसारख्या बऱ्याच चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. तर ‘रुप की रानी चोरों का राजा’, ‘प्रेम’, ‘हम आपके दिल मे रहते है’, ‘तेरे नाम’ यांसारख्या चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शन केलं.