Join us

कल्लू मामाला राग येतो तेव्हा...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 3:12 PM

‘सत्या’ या चित्रपटातील कल्लू मामा अर्थात सौरभ शुक्ला अलीकडे जाम संतापले. मग काय, चित्रपटाच्या सेटवर त्यांनी जोरदार गोंधळ घातला.

ठळक मुद्देमनोज झा दिग्दर्शित या चित्रपटात जिमी शेरगिल, माही गिल, सौरभ शुक्ला, नंदिश संधू, सुप्रीया पिळगावकर, मनोज पाहवा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

‘सत्या’ या चित्रपटातील कल्लू मामा अर्थात सौरभ शुक्ला अलीकडे जाम संतापले. मग काय, चित्रपटाच्या सेटवर त्यांनी जोरदार गोंधळ घातला. इतकेच नाही तर चित्रपटाच्या लेखकाला फैलावर घेत, त्याला शिवीगाळही केली. ‘फॅमिली ऑफ ठाकुरगंज’ या आगामी चित्रपटाच्या सेटवर हा सगळा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. सध्या जिमी शेरगिल आणि माही गिल स्टारर ‘फॅमिली ऑफ  ठाकुरगंज’ या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. दामिनी, घायल, दबंग यासारख्या चित्रपटांची कथा लिहिणारे लेखक दिलीप शुक्ला यांनी ‘फॅमिली ऑफ  ठाकुरगंज’ची कथा लिहिली आहे.

मीडियाचे मानाल तर, ‘फॅमिली ऑफ ठाकुरगंज’च्या शूटींगदरम्यान दिलीप शुक्ला सतत सौरभ यांना हा संवाद असा नाही तसा म्हणा, असे सल्ले देत होते. सौरभ कथेच्या हिशेबाने डायलॉग म्हणत होते. पण दिलीप यांनी त्यांच्यावर ‘दबंगगिरी’ सुरु केली. मग काय, सौरभ शुक्ला यांनाही राग आला. इतका की, त्यांनी दिलीप शुक्ला यांना केवळ मारायचेच बाकी ठेवले.

दोघांमध्येही जोरदार भांडण झाले. यानंतर सौरभ यांनी स्वत:ला व्हॅनिटी व्हॅनमध्ये बंद करून घेतले. अशा वातावरणात मी काम करू शकत नाही, असे सांगून त्यांनी काम करण्यास नकार दिला. पाच तास झाले तरी ते मानेनात. अखेर निर्मात्यांनी कशीबशी त्यांची समजूत काढली आणि सौरभ शूटींगसाठी पोहोचले.

या चित्रपटाच्या सेटवर लेखक दिलीप शुक्ला यांच्या मनमानीने सगळेच त्रस्त असल्याचे कळतेय. तूर्तास सौरभ यांनी या प्रकरणावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे. निर्मात्यांनी हे भांडण ‘रचनात्मक मतभेद’ असल्याचे म्हटले आहे.  मनोज झा दिग्दर्शित या चित्रपटात जिमी शेरगिल, माही गिल, सौरभ शुक्ला, नंदिश संधू, सुप्रीया पिळगावकर, मनोज पाहवा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

टॅग्स :माही गिलजिमी शेरगिल