प्रेक्षकांना नेहमीच काहीतरी वेगळं हवं असतं. हीच गोष्ट ध्यानात घेऊन मराठी निर्माते-दिग्दर्शकही काहीतरी नावीन्यपूर्ण देण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असतात. मराठीत अलीकडच्या काळात रहस्यमय चित्रपट अभावानेच आले आहेत. हीच गोष्ट ओळखून सायकोलॉजीकल थ्रीलर असलेल्या ‘सविता दामोदर परांजपे’ या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. आशयघन पटकथा, अर्थपूर्ण संवाद, दर्जेदार निर्मितीमूल्ये आणि दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने सजलेला हा सिनेमा शुक्रवारपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.
या सिनेमाची बरीच वैशिष्ट्ये आहेत. १९८५ मध्ये रंगभूमीवर आलेल्या ‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकावर हा सिनेमा बेतला आहे. या सिनेमाच्या निमित्ताने हिंदीतील आघाडीचा अभिनेता जॉन अब्राहमची पावलं मराठीकडे वळली आहेत. जॉनने या सिनेमाची निर्मिती केली आहे. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल यांचा वारसा लाभलेली त्यांची मुलगी तृप्ती हिने या सिनेमाच्या निमित्ताने सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. रंगभूमीवर गाजलेली कलाकृती सिनेमाच्या रूपाने परत अनुभवायला मिळणार असल्याने रसिकांमध्येही या सिनेमाबाबत कमालीची उत्सुकता आहे. आजच्या पिढीतील प्रेक्षकांनाही या नाटकातील थ्रील अनुभवता यावं याकरीता दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे-जोशी यांनी ‘सविता दामोदर परांजपे’ हा सिनेमा बनवण्याचं शिवधनुष्य उचललं.
या सिनेमाची कथा शरद आणि कुसुम अभ्यंकर या दाम्पत्याभोवती गुंफण्यात आली आहे. एका सुखी कुटुंबात अचानक काही विचित्र घटना घडू लागतात. मानवाच्या आकलनापलिकडच्या या घटनांचा वेध विज्ञानाच्या आधारे घेतला जातो आणि अमानवी शक्तींसोबतच्या या लढ्याचा उलगडा होत जातो. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारं आणि अनपेक्षित घटनांच्या आधारे रोमांच निर्माण करणारं कथानक ही या सिनेमाची सशक्त बाजू आहे. सुबोध भावे, तृप्ती तोरडमल, राकेश बापट, अंगद म्हसकर, पल्लवी पाटील, सविता प्रभुणे आदि कलाकारांनी तितक्याच ताकदीने अभिनय करत या सिनेमाचा भार उचलला आहे.
सशक्त कथानकाला सुमधूर संगीताची सुरेल किनार जोडण्याचं काम संगीतकार अमितराज आणि निलेश मोहरीर यांनी केलं आहे. मंदार चोळकर आणि वैभव जोशी यांनी या सिनेमासाठी गीतलेखन केलं आहे. स्वप्नील बांदोडकर, आदर्श शिंदे, जान्हवी प्रभू-अरोरा आणि निशा उपाध्याय-कापडीया या गायकांच्या समुधूर आवाजातील ‘जादुगरी’, ‘स्वामी समर्थ’, ‘किती सावरावा’, ‘वेल्हाळा’ ही वेगवेगळ्या मूडमधील गीतं सिनेमाच्या कथेशी एकरूप होणारी आहेत.
जे.ए.एन्टरटेन्मेंट’ आणि ‘पॅनोरमा स्टुडिओज’ ‘सविता दामोदर परांजपे’ या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते आहेत. या सिनेमाची कथा शेखर ताम्हाणे यांनी लिहिली असून, शिरीष लाटकर यांनी संवादलेखन केलं आहे. छायांकन प्रसाद भेंडे यांनी केलं असून, क्षितिजा खंडागळे यांनी संकलन केलं आहे. योगेंद्र मोगरे, तृप्ती मधुकर तोरडमल सहनिर्माते आहेत. संतोष फुटाणे यांचं कलादिग्दर्शन, प्रणाम पानसरे यांचं ध्वनी संयोजन, मालविका बजाज यांची वेशभूषा आणि विनोद सरोदे यांच्या रंगभूषेने हा सिनेमा आणखी दर्जेदार बनवण्यात सहाय्य केलं आहे.
‘पॅनोरमा स्टुडिओ डिस्ट्रीब्युशन एल.एल.पी’ ने ‘सविता दामोदर परांजपे’ चित्रपटाचे वितरण केले असून आज हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. सशक्त कथानकाला उत्तम दिग्दर्शन आणि अभिनयाची साथ लाभल्याने ‘सविता दामोदर परांजपे’ च्या रूपात एक जबरदस्त थरारपट पाहिल्याचा अनुभव प्रेक्षकांना येईल यात शंका नाही.