Join us

सयाजी शिंदेंच्या वृक्ष लागवड चळवळीला समाजकंटकांचा खोडा; कुंपण, पाण्याची पाईप फोडली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 12:18 PM

Sayaji Shinde: सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई सामाजिक संस्थेच्या कोल्हापूरमधील वृक्षारोपण कार्यात समाजकंटक अडथळा आणत असल्याचे समोर आले आहे.

हिंदी, साउथ आणि मराठी चित्रपटात आपल्या दमदार अभिनय कौशल्याने घराघरांत पोहोचलेले अष्टपैलू अभिनेते म्हणून सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांना ओळखले जाते. सयाजी शिंदे हे गेल्या अनेक वर्षांपासून स्वत: वृक्षारोपणाची जबाबदारी पेलताना दिसत आहे. एक उत्तम अभिनेते असण्यासोबतच ते पर्यावरणप्रेमीही आहेत. अनेकदा ते त्यांच्या सोशल मीडियाद्वारे प्रत्येकाला वृक्षारोपण करण्यासाठी आवाहन करताना दिसतात. त्यांनी कोल्हापूरमध्ये आम्ही जांभळीकर ग्रुपसोबत सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई सामाजिक संस्थेसोबत वृक्षारोपणाचे कार्य कार्य केले होते. यावेळी सयाजी शिंदे यांच्यासोबत सागर कारंडेदेखील उपस्थित होता. मात्र या कार्यात काही समाजकंटक लोकांनी अडथळा आणण्यास सुरूवात केल्याची बाब समोर आली आहे.

सयाजी शिंदे कोल्हापूरमध्ये  बारा एकर क्षेत्रामध्ये तीन हजार देशी वृक्ष लागवडीचे कार्य सुरू आहे. या कामाला लोक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले असून गावातील युवक महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले सर्वजण येऊन या ठिकाणी दररोज श्रमदान करत असतात.

संपूर्ण प्रकल्प लोकवर्गणीतून उभारला आहे आणि आम्ही जांभळीकर ग्रुपचे सदस्य दर महिन्याला मासिक वर्गणी जमा करत असतात. मात्र काही समाजकंटक लोकांनी या कार्यात विघ्न आणायला सुरुवात केली आहे.

पाण्याची पाईपलाईन फोडणे,कंपाउंड तोडणे असे प्रकार काही दिवसापासून या ठिकाणी सुरू आहेत. कष्टाने उभारलेली ही झाडे वाचवण्यासाठी आता शासकीय पातळीवरून प्रयत्न झाले पाहिजेत, अशी मागणी सह्याद्री देवराई जांभळी यांच्या वतीने करण्यात येत आहे.

टॅग्स :सयाजी शिंदे