नवरा बायको म्हटलं की, प्रेम आणि रुसवे फुगवे हे आलेच. अशाच नवरा बायकोच्या जीवनावर आधारित 'यु टर्न' ही वेबसिरीज रसिकांच्या भेटीला आली आहे. या वेबसिरीजचा पहिला भाग प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच भागामध्ये मुक्ता आणि आदित्य घटस्फोट घेण्यासाठी वकिलांसमोर बसून घटस्फोट घेण्याची कारणे देत आहे. मुक्ता आणि आदित्य जरी भांडत असले तरी त्यांच्या भांडणातूनही एकमेकांबद्दल असलेले प्रेम, काळजी व्यक्त होते आहे. असं म्हणतात, लग्न हे दोन व्यक्तींचे नसून दोन कुटुंबांचे असते. मग घटस्फोट पण दोन कुटुंबांचा असतो का? याच प्रश्नाचे सुंदर उत्तर मुक्ता या भागातून देताना दिसत आहे.
घटस्फोट होत असून सुद्धा सासरच्या लोकांसोबत अतिशय सुंदर नातं मुक्ताचे आहे. मात्र घटस्फोट घेत असल्यामुळे एक प्रकारचा पेच मुक्ता आणि तिच्या सासरच्या लोकांमध्ये निर्माण झालेला दिसतो. स्वइच्छेने घटस्फोट घेत असूनही आदित्य आणि मुक्ताच्या मनात एक वेगळीच चलबिचल सुरु आहे. पहिला भाग पाहिल्यानंतर दुसऱ्या भागात काय होणार याबद्दलची उत्सुकता निर्माण होते. या वेबसिरीजमध्ये ओमप्रकाश शिंदे आणि सायली संजीव यांची प्रमुख भूमिका आहे.
सायली संजीव ही काहे दिया परदेसमध्ये झळकली होती. पहिल्याच मालिकेतून तिने रसिकांची पंसती मिळवली होती. मालिकेत तिने साकारलेली गौरी या भूमिकेला तर रसिकांनी अक्षरक्षः डोक्यावर घेतलं होतं. मालिका बंद झाल्यानंतर सायली हिंदी मालिकेकडे वळली.'परफेक्ट पति' या मालिकेतून हिंदी रसिकांचीही मनं जिंकली. दिवसेंदिवस तिची लोकप्रियता वाढत आहे. हीच पॉप्युलारिटी इनकॅश करण्यासाठी निर्मात्यांनी सायली संजीवची या वेबसिरीजसाठी निवड केली आहे.
ओमप्रकाशने 'खुलता कळी खुलेना', 'का रे दुरावा' आणि 'लक्ष्मी सदैव मंगलम' यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. आत पहिल्यांदा सायली आणि ओमप्रकाश एकत्र वेबसिरीजमध्ये झळकणार म्हटल्यावर त्यांची ही जोडी रसिकांना कितपत पसंतीस पात्र ठरते हे पाहणे रंजक ठरणार आहे.