कार्यक्षेत्र कोणतेही असो, जे काम करायचे ते मनापासून आणि इतरांच्या मनाला भिडणारे असेच असेल पाहिजे. याच पठडीतला चतुरस्त्र अभिनेता म्हणजे मिलिंद गुणाजी. या अभिनेत्याने आता वैज्ञानिक क्षेत्राची वाट धरली आहे. मिलिंद गुणाजी यांनी वैज्ञानिक क्षेत्राची वाट का चोखाळली, असा प्रश्न तुम्हला पडला असेल? रेड बेरी एंटरटेन्मेंट प्रस्तुत श्री सदिच्छा फिल्म्स निर्मित आगामी कौल मनाचा या चित्रपटात तो एका वैज्ञानिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. डॉ. रत्नाकर नारळीकर असे या व्यक्तिरेखेचे नाव आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन भीमराव मुडेंचे आहे. २१ आॅक्टोबरला कौल मनाचा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटातील कथेची गरज म्हणून विज्ञान प्रदर्शन भरवायचे होते, यासाठी लोणावळ्याच्या एका शाळेने पुढाकार घेत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनासाठी शाळेतल्या विद्यार्थ्यांनी बनवलेले विविध प्रयोगशील प्रकल्प पाहून मिलिंद गुणाजी भारावून गेले. मुलांच्या प्रयत्नांचे त्यांनी मनापासून कौतुक तर केलेच, तसेच आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल असल्याचे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. मिलिंद गुणाजींसह या चित्रपटात राजेश शृंगारपुरे, समीर धर्माधिकारी, अमृता पत्की, विजय चव्हाण, जयवंत वाडकर, विजय गोखले,वर्षा दांदळे, कमलेश सावंत, श्वेता पेंडसे, आशुतोष गायकवाड, गिरिजा प्रभू, निनाद तांबडे, गणेश सोनावणे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. तसेच या चित्रपटाची निर्मिती राजेश पाटील, विठ्ठल रूपनवर आणि नरशी वासानी यांनी केली आहे. हा चित्रपट एका वेगळ्या विषयावरील असल्याने तो तरुणच नाही, तर पालकांनादेखील नक्कीच आवडू शकतो. चित्रपटातील सर्वच कलाकारांनी अतिशय उत्तम काम केले आहे. या टिनएजर्सची फिल्मी कथा मोठ्या पडद्यावर पाहायची असेल, तर थोडी वाट बघावी लागणार आहे.
वैज्ञानिक मिलिंद गुणाजी
By admin | Published: October 20, 2016 2:14 AM