संदीप आडनाईकपणजी : “प्रत्येक प्रॉडक्शन डिझायनरसाठी (निर्मिती संकल्पचित्रकार) चित्रपटाची पटकथा ही बायबल असते, प्रॉडक्शन डिझायनरला पटकथेवरून त्याच्या पुढील कामाची दिशा कळते त्याचा मुख्य संदर्भ हा पटकथाच असतो, अशा शब्दात एफटीआयआय (चित्रपट व दूरचित्रवाणी संस्था) चे प्राध्यापक प्रा. उज्ज्वल गावड यांनी चित्रपटाची निर्मिती कला, दृश्य कला आणि सिनेसृष्टीतील कथाकथनाची कलाकुसर याबद्दलचे अंतरंग उलगडले.भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पहिल्याच मिश्र पद्धतीच्या ऑनलाइन विभागात, “प्रॉडक्शन डिझाईन- अ वर्ल्ड बिल्डिंग फॉर फिल्म्स” या ऑनलाईन सत्रामध्ये ते बोलत होते. त्यांनी चित्रपट निर्मिती प्रक्रियेतील पटकथाच्या महत्त्वावर जोर दिला.दिग्दर्शक, छायाचित्रण दिग्दर्शक आणि प्रॉडक्शन डिझायनर यांची कल्पनाशक्ती, कलात्मकता आणि सहयोगातून चलचित्राची आकृती आणि शैली तयार केली जाते. “प्रॉडक्शन डिझायनरला दिग्दर्शक, छायाचित्रण दिग्दर्शक आणि लेखाकासोबत कशाप्रकारे एकरूप व्हायचे हे माहित असणे आवश्यक आहे. प्रॉडक्शन डिझायनरने दिग्दर्शकाची दृष्टी आणि चित्रपटाच्या शैलीचे अनुसरण केले पाहिजे. व्हीएफएक्स डिझायनर, कॉस्ट्यूम डिझायनर रंगाच्या बाबतीत एकाच दिशेने विचार करत असल्याने प्रॉडक्शन डिझायनरने त्यांच्या सोबत तसेच समक्रमित ध्वनीमुद्रणाची आवश्यकता असल्यास ध्वनी संकल्पकासोबत काम केले पाहिजे. असे ते म्हणाले.प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे देताना ते म्हणाले की चित्रपट म्हणजे कृत्रिम आणि कलेचे संयोजन आहे त्यामुळे संस्थात्मक प्रशिक्षण घेणे सक्तीचे नाही. यावेळी त्यांनी जॉन मायह्रे (शिकागो), ब्रायन मॉरिस (पायरेट्स ऑफ द कॅरिबियन), नितीश रॉय, स्निग्धा बासू, आराधना सेठ आणि सुझान कॅप्लन मेरवानजी (गल्ली बॉय) या त्यांच्या आवडत्या प्रॉडक्शन डिझाइनरचा उल्लेख केला.
"पटकथा ही प्रत्येक प्रॉडक्शन डिझायनरसाठी बायबल; दिशा अन् शैलीचं अनुसरण करावे"
By संदीप आडनाईक | Published: January 22, 2021 5:06 PM