Join us

जादूई स्वरांचा ऋतू हिरवा! ७ दशकांपासून आशाताईंच्या स्वरांनी रसिकांच्या काळजात घर केलंय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 6:07 AM

जादुई आवाजाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आशा भोसले. भक्तीगीत असो, नाट्यगीत असो, लावणी असो, गजल असो, ठुमरी असो की पॉप... गाण्याच्या हरेक प्रकारांत आशाताईंनी आपल्या आवाजाचा स्वतंत्र ठसा उमटविलेला आहे.

अगदी रामप्रहरी ‘प्रभाती सूर नभी रंगती’ या गाण्याचे सूर आपल्या कानी पडतात आणि आपली सकाळ प्रसन्न होतेच होते. तर जेव्हा ‘नाच रे मोरा’ हे गाणं आपण ऐकतो तेव्हा बालपणीच्या आठवणींचे मोर आपल्या सभोवती थुईथुई नाचल्याशिवाय राहात नाहीत. अगदी तारुण्याच्या उंबरठ्यावर असतानाच्या प्रेमसुलभ भावना व्यक्त करायच्या असतील तर ‘मलमली तारुण्य माझे’ हे गाणं अगदी जवळचं वाटतं. तर आयुष्याच्या संध्याकाळी आजवरच्या सुखदुःखांचा हिशेब मांडत असताना ‘भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले’ हे शब्द जेव्हा कानावर पडतात, तेव्हा आशाताईंच्या आवाजातला गहिरा दर्द काळजाला चिरत जातो. आवाजातला ठसका, नजाकत आणि मादकता हे सारं सारं एकाच गळ्यातून जेव्हा अवतरतं, तेव्हा कानसेनांना स्वर्गसुखाची प्रचिती नक्कीच येते. आशाताईंचं गाणं म्हणजे तमाम रसिकांसाठी त्यामुळेच नक्षत्रांचं देणं ठरलेलं आहे.

गेल्या सात दशकांहून अधिक काळ आशाताईंच्या स्वरांनी रसिकांच्या काळजात घर केलेलं आहे. त्यामुळेच तर जेव्हा जेव्हा आपण आशाताईंची अवीट गोडीची गाणी ऐकतो, तेव्हा आपल्या मनाची अवस्था ‘मी मज हरपून बसले गं’ यासारखीच होत असते. वडील पंडित दीनानाथ मंगेशकरांकडूनच गाण्याचं बाळकडू घेतलेल्या आशाताईंनी मोठी बहीण लता मंगेशकर यांच्यासोबतच संगीतक्षेत्रात पाऊल ठेवलं. पण, आपल्या स्वतंत्र गायनशैलीने वेगळेपण सिद्ध केलं. उमेदवारीच्या काळात मुख्य नायिकांपेक्षाही सहनायिकांसाठीच आशाताईंचा आवाज वापरला जायचा. पण, त्यातही त्यांनी लक्षणीय प्रयोग केले व चित्रपटसंगीताच्या मुख्य प्रवाहात स्वतःची नवी वाट निर्माण केली. व्यक्तिगत आयुष्यात अनेक चढउतार अनुभवलेल्या आशाताईंनी त्याचा फारसा विचार न करता खंबीरपणे परिस्थितीला मात दिली. केवळ गाणंच नव्हे तर अभिनय आणि मिमिक्रीतही त्यांचा हातखंडा आहे. त्यांना जितकं गाणं आवडतं तितकंच क्रिकेटही. गाण्याइतकीच पाककलाही त्यांना प्रिय आहे. त्यांच्या या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वामुळेच त्या लोकप्रिय ठरल्या. 

पारंपरिक शास्त्रीय संगीताप्रमाणेच त्यांनी पाश्चिमात्य संगीतातही लक्षणीय प्रयोग केले. त्यामुळेच तर त्यांचं ग्रॅमी सारख्या जागतिक स्तरावरील सर्वोच्च पुरस्कारासाठी नामांकन झालं होतं. उतारवयातही त्या ‘खल्लास’ सारखं गाणं गातात आणि नव्या पिढीच्याही गळ्यातला ताईत होतात. त्यामुळेच आशाताईंच्या गाण्यात कुठेही जनरेशन गॅप जाणवत नाही. त्यांनी कायमच स्वतःला कालसुसंगत ठेवलेलं आहे. त्याचाच उचित गौरव राज्य सरकारनं महाराष्ट्र भूषण हा राज्याच्या सर्वोच्च पुरस्कार जाहीर करून केला आहे. खरं तर आशाताईंना हा गौरव यापूर्वीच मिळायला हवा होता, पण उशिराने का होईना आशाताईंच्या मलमली स्वरांचा मखमाली गौरव होतो आहे, याचा तमाम रसिकांना खचितच आनंद आहे. आशाताईंच्या गाण्याचा हा ऋतू हिरवा रसिकांच्या मनात कायमच बहरत राहील यात शंका नाहीच पण या निमित्ताने महाराष्ट्र भूषण पुरस्कारालाच नक्षत्राचं देणं लाभलं आहे, हे नक्की.   - दुर्गेश सोनार

त्या खूप कष्टाने उभ्या राहिल्याआशा भोसले संगीत क्षेत्रात खूप कष्टाने उभ्या राहिल्या आहेत. अनेक वर्षे त्यांनी संगीत सृष्टीसाठी आपले योगदान दिले. खरं तर हा पुरस्कार त्यांना खूप आधी मिळायला हवा होता. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मला आनंद होत आहे.        - उषा मंगेशकर (ज्येष्ठ गायिका)

आशाचे मन:पूर्वक अभिनंदनमाझी बहिण आशा भोसले हिला २०२० सालचा अत्यंत मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल मी आशाचे मन:पूर्वक अभिनंदन करते आणि तिला आशिर्वाद देते.- लता मंगेशकर, स्वरसम्राज्ञी

१९४३ पासून कारकिर्दीला सुरुवात केलेल्या आशा भोसले यांनी आजवर मराठीसह जवळपास सर्व भारतीय भाषांमध्ये गाणी गायली आहेत. इंग्रजी व रशियन भाषेतही त्यांनी गाणी गायली. 

गाताना त्यांचे दोनशे टक्के योगदानआशा भोसले यांच्यासारख्या दैवी गायिकेला जगभरातील सगळे पुरस्कार मिळायला हवेत. त्यांचे गाणे ऐकत आम्ही लहानाचे मोठे झालो. त्यांनी संपूर्ण भारताला गाणे काय असते ही शिकविले. आशा भोसले यांच्या सोबत अनेकदा गायनाची संधी मिळाली. त्यांची गाण्याकडे पाहण्याची दृष्टी काही औरच आहे. गाणे गाताना ते आपले शंभर पैकी दोनशे टक्के योगदान देतात.     - सुरेश वाडकर (ज्येष्ठ गायक)  

अतिशय आनंदाचा क्षणआशा भोसले यांना ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार मिळाला हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. हा पुरस्कार त्यांना मिळायला हवाच होता. अतिशय अनिवार्य अशी ही गोष्ट होती. आशा भोसले यांना ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार मिळणे, हा त्या पुरस्काराचाच सन्मान आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने आशा भोसले यांची मराठीतील कार्याची अधिकृतपणे दखल घेतली गेली आहे, असे मला वाटते आणि त्याचा मला निस्सीम आनंद आहे. आशा भोसले यांनी सुरेलपणा आणि आवाजाची क्वालिटी एवढी वाढवून ठेवली आहे, की त्याच्या कमी पातळीवरचे गाणे आपल्याला आता चालतच नाही. महाराष्ट्राची तमाम जनता आशा भोसले यांच्या सुराने लाडावलेली आहे.- कौशल इनामदार (संगीतकार)

पुढच्या पिढीची जबाबदारी  वाढतेआशा भोसले यांना मिळालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारामुळे वास्तविक हा पुरस्कारच उजळून निघाला आहे. आशाताई काय किंवा लतादीदी काय, ही जागतिक स्तरावरची मंडळी आहेत. त्यांना मिळणाऱ्या पुरस्कारामुळे पुढच्या पिढीची जबाबदारी खूप वाढते. ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कारामुळे त्यांचा आशीर्वादच या पुरस्काराला लाभला आहे आणि या पुरस्काराच्या रूपाने महाराष्ट्रातील रसिकांना त्यांचा आशीर्वाद मिळाला आहे.- सलील कुलकर्णी  (संगीतकार)

संगीतक्षेत्रात दिलेले योगदान प्रचंडखूपच आनंदाची बातमी आहे. वास्तविक कितीही पुरस्कार त्यांना मिळाले, तरी ते कमीच होतील. त्यांनी मराठी संगीतक्षेत्रात दिलेले योगदान प्रचंड आहे. चित्रपटांतील गाण्यांसह नॉन फिल्मी गाण्यांसाठी त्यांनी गायलेली गाणीही महत्त्वाचे स्थान राखून आहेत. ही गाणी असोत, नाट्यसंगीत असो किंवा गझल असो, अशा विविध प्रकारची गाणी सहज गाणाऱ्या त्या एकमेव व्यक्ती आहेत. - नेहा राजपाल (पार्श्वगायिका)

टॅग्स :आशा भोसले