Join us

विठ्ठलाच्या दारी, सिने-मालिकांची वारी, पाहा कोणकोणत्या कलाकारांनी साकारलेला विठूराया

By संजय घावरे | Published: June 29, 2023 10:39 AM

मराठी मनोरंजन विश्वाला नेहमीच पंढरीच्या वारीसोबतच विठूरायानेही मोहिनी घातली आहे.

मराठी मनोरंजन विश्वाला नेहमीच पंढरीच्या वारीसोबतच विठूरायानेही मोहिनी घातली आहे. १९३६ मध्ये रिलीज झालेल्या दिग्दर्शक व्ही. दामले यांच्या 'संत तुकाराम'मध्ये विष्णुपंत पागनीसांनी साकारलेले तुकाराम महाराज अविस्मरणीय ठरले आणि मनोरंजन जगताची विठ्ठलाच्या दारी सिनेमा व मालिकांची वारी सुरू झाली. 'विठ्ठल माझा सोबती' चित्रपटापर्यंत पोहोचल्या या प्रवासात काही कलाकारांनी साकारलेला विठूराया रसिकांना भावला.

१९४० मध्ये दिग्दर्शक व्ही. दामले यांचा 'संत ज्ञानेश्वर', १९४४ मध्ये केशवराव दातेंचा 'भक्तीचा मळा' या चित्रपटांसोबतच १९८८ मध्ये रिलीज झालेल्या रमाकांत कवठेकर दिग्दर्शित 'पंढरीची वारी'मध्ये बालकलाकार बकुल कवठेकरने रंगवलेला विठ्ठल कायम स्मरणात राहिला. त्यानंतर 'संत गोरा कुंभार', 'भक्त पुंडलिक', 'माहेर माझे हे पंढरपूर', 'संत चोखामेळा', 'संत नामदेव', 'मुंगी उडाली आकाशी', 'झाला महार पंढरीनाथ', 'संत एकनाथ महाराज', 'संत गोरा कुंभार', 'संत जनाबाई', 'संत सावता माळी', 'संत एकनाथ महाराज', 'संत जनाबाई', ‘दिंडी निघाली पंढरीला’, गजेंद्र अहिरेंचा ‘विठ्ठल विठ्ठल’, परेश मोकाशींचा ‘ऐलिझाबेथ एकादशी’, निशिकांत कामतचा 'लय भारी', आदित्य सरतोदारचा ‘माऊली’, चंद्रकांत कुलकर्णींचा 'तुकाराम' या चित्रपटांमध्ये रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना वारी पहायला मिळाली.

विठ्ठल - सचित पाटीलराजीव रुईया यांनी दिग्दर्शित केलेला 'विठ्ठल' हा चित्रपट २०१८मध्ये रिलीज झाला. यात सचित पाटीलने पंढरपूरच्या पांडुरंगाच्या रूपात दर्शन दिले. यात हर्षदा विजय या नवोदित अभिनेत्रीच्या जोडीला अशोक समर्थ, भाग्रश्री मोटे, दीप्ती धोत्रे, हितेन तेजवानी आणि प्रार्थना बेहरे यांच्या भूमिका होत्या.

थँक यू विठ्ठला - महेश मांजरेकरमकरंद अनासपुरेची मुख्य भूमिका असलेल्या 'थँक यू विठ्ठला' चित्रपटात महेश मांजरेकरांनी पुणेरी पगडी आणि डोळ्यांना गॉगल लावलेला विठ्ठल साकारला होता. देवेंद्र जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात पूर्वी भावे, अभिजीत चव्हाण, किशोर चौगुले, तेजा देवकर, सुनील गोडबोले, प्रदीप पटवर्धन, कमलेश सावंत आदी कलाकार होते.

विठ्ठल माझा सोबती - संदीप पाठकमागील काही वर्षांपासून वास्तवात पंढरीची वारी अनुभवणाऱ्या संदीप पाठकची जणू पुण्याई फळाला आली आणि त्याला 'विठ्ठल माझा सोबती' सिनेमा मिळाला. संदीप नवरे दिग्दर्शित या चित्रपटात तो चोररूपी विठ्ठलाच्या भूमिकेत असून, जोडीला अरुण नलावडे, आशय कुलकर्णी, दिव्या पुगांवकर, राजेंद्र शिसाटकर, अश्विनी कुलकर्णी आहेत.

तू माझा सांगाती २ – भरत जाधवलेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरच्या गाजलेल्या 'तू माझा सांगाती' या मालिकेच्या दुसऱ्या पर्वात सर्वसामान्यांचे लाडके दैवत असलेल्या विठ्ठलरूपात महाराष्ट्राचा लाडका अभिनेता अशी ओळख असलेला भरत जाधव दिसला. भरतसोबत स्मिता शेवाळेने रुक्मिणीची भूमिका साकारली होती. या मालिकेत विठ्ठल-रखुमाईची संसारगाथा पहायला मिळाली.

विठू माऊली - अजिंक्य राऊतमहेश कोठारेंच्या 'विठू माऊली' या मालिकेद्वारे विठूरायाच्या रूपात घरोघरी पोहोचलेल्या अजिंक्य राऊतला रसिकांचे अपार प्रेम मिळाले. योगायोग म्हणजे अजिंक्यचा जन्म एकादशीला झाला आहे. त्याने 'मन उडु उडु झालं' या गाजलेल्या मालिकेमध्येही अभिनय केला आहे..................................दाक्षिणात्य चित्रपटांनाही भुरळ...१९७४ मध्ये मधुसूदन राव यांचा ‘भक्त तुकाराम’ हा मूळ तमिळ चित्रपट मराठीत डब करून रिलीज करण्यात आला होता. यात ए. नागेश्वरराव यांनी तुकारामांची, अंजलीदेवींनी आवलीची, तर श्रीदेवीने (बालकलाकार) त्यांच्या मुलीची भूमिका साकारली होती...................................ही गाणी गाजली...राजदत्त दिग्दर्शित 'देवकीनंदन गोपाला' चित्रपटात श्रीराम लागूंनी संत गाडगे महारांजांची भूमिका साकारली होती. यातील दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेले 'विठ्ठलाच्या पायी थरारली वीट...' हे भीमसेन जोशींच्या आवाजातील गाणे खूप गाजले. ‘अरे संसार संसार’मधील सुधीर फडकेंनी गायलेले व अनिल अरुण यांनी संगीत दिलेले ‘विठू माउली तू माउली जगाची...’ आजही लोकप्रिय आहे. ग. दि. माडगूळकरांनी लिहिलेले ‘प्रपंच’ चित्रपटातील फडकेंच्या आवाजातील ‘फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार...’, फडकेंचेच ‘संत गोरा कुंभार’ चित्रपटातील ‘तुझे रुप चित्ती राहो...’ आणि फडकेंनीच वसंतराव देशपांडेंसोबत ‘झाला महार पंढरीनाथ’साठी गायलेले ‘कानडा राजा पंढरीचा...' अशी बरीच गाणी अजरामर आहेत.

टॅग्स :महेश मांजरेकर भरत जाधवसचित पाटील