Join us

रंजक गोष्टीचा आत्मघात

By admin | Published: July 11, 2015 10:44 PM

दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, हृषीकेश जोशी, क्रांती रेडकर, संजय खापरे, मानसी नाईक, विकास कदम, कमलाकर सातपुते अशी कलावंतांची मजबूत फळी चित्रपटात आहे

- राज चिंचणकर

‘मर्डर मेस्त्री’ (मराठी चित्रपट)

दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, हृषीकेश जोशी, क्रांती रेडकर, संजय खापरे, मानसी नाईक, विकास कदम, कमलाकर सातपुते अशी कलावंतांची मजबूत फळी चित्रपटात आहे म्हटल्यावर साहजिकच या चित्रपटात नक्की काय असणार याची उत्सुकता शिगेला पोहोचते. त्यातच भरीला भर या चित्रपटाच्या रहस्यमय शीर्षकामुळे अपेक्षा अधिकच उंचावतात. पण एवढे सगळे आघाडीचे कलावंत चित्रपटात असूनही त्यांचे गारुड काही केल्या मनावर का होत नाही, असा प्रश्न ‘मर्डर मेस्त्री’ या चित्रपटातून समोर उभा ठाकतो आणि डोक्याला बराच ताण देऊनही त्याचे उत्तर काही सापडत नाही. मग बिनसलंय कुठे, हे पाहायला गेल्यावर नक्की घोळ काय याचे चित्र स्पष्ट होऊ लागते. वास्तविक, नेहा कामतने लिहिलेली या चित्रपटाची कथा रंजक आहे. म्हणजे त्यात तद्दन व्यावसायिक चित्रपटासाठी आवश्यक असलेला मसाला पुरेपूर आहे; पण तिची मांडणी करताना बराच घोळ झाल्याने एका रंजक गोष्टीचा थेट आत्मघात झाल्याचे ठसत जाते. सावंतवाडीतल्या प्रभाकर या पोस्टमनला लोकांची पत्रे वाचण्याचा भलताच नाद आहे. ही त्याची सवय एकदा उघडकीस येऊन तो लोकांचा मारही खातो; पण त्याच्यात सुधारणा काही होत नाही. असेच एकदा एक पोस्टकार्ड वाचत असताना त्यातल्या मजकुराने तो तीन ताड उडतो. कुणा माधव मेस्त्री नामक व्यक्तीचा खून होण्याचे सूतोवाच त्यात केलेले असते. साध्याभोळ्या प्रभाकरला या माधव मेस्त्रीला वाचवण्याची हुक्की येते आणि तो कामाला लागतो. पण शोध घेतल्यावर त्याच्या लक्षात येते, की सावंतवाडीत तीन माधव मेस्त्री राहत आहेत. त्यातला एक डॉक्टर, एक माजी सरपंच आणि एक नवविवाहित तरुण आहे. आता या तिघांपैकी नक्की कुणाचा खून होणार, या पेचात प्रभाकर सापडतो आणि त्याच्या परीने तो हे रहस्य सोडवायच्या मागे लागतो. ही या चित्रपटाची कथा आहे आणि नेहा कामतने ती पुरेशी रंगवलीही आहे. पण यात दोन कच्चे दुवे आहेत. खुनाची वाच्यता साध्या पोस्टकार्डवर कुणी करेल, हे सहज पटत नाही; तसेच तीन माधव मेस्त्रींपैकी कुणा एकाचा तरी पत्ता त्या पोस्टकार्डवर नाही का, असा प्रश्नही पडतो. ही गोष्ट मांडताना पुढे बऱ्यापैकी गडबड होत गेली आहे. दिग्दर्शक राहुल जाधव यांनी यात कलाकारांची दमदार मोट बांधली आहे; परंतु त्यांचा हवा तितका प्रभाव पडत नाही. प्रशांत लोके यांची पटकथा दोन पावले मागे राहून चालत राहते आणि संवाद अनेकदा बालीश पातळीवर उतरतात. परिणामी विनोदाच्या नावाखाली जे काही करता येईल, ते सर्व यात ओढूनताणून आणण्याचा केलेला प्रयत्न आपटी खातो. हा सगळा सावळागोंधळ यातल्या मेस्त्रींच्या तीन जोड्या आणि एका पोस्टमनच्या खांद्यावर वाहून नेला आहे. हेकट व्यक्तिमत्त्व असेलेले डॉक्टर माधव मेस्त्री (दिलीप प्रभावळकर) व त्यांची पत्नी मालिनी (वंदना गुप्ते), दारुड्या असलेला माजी सरपंच माधव मेस्त्री (संजय खापरे) व फिल्मी दुनियेत रंगणारी त्याची पत्नी सरस्वती (क्रांती रेडकर) आणि नवविवाहित तरुण माधव मेस्त्री (विकास कदम) व त्याची आकर्षक पत्नी हेमलता (मानसी नाईक) हे सहा जण या गोतावळ्यात सामील आहेत. या सगळ्या कलावंतांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या व्यक्तिरेखांमध्ये त्यांच्या अनुभवाच्या जोरावर रंग भरण्याचा प्रयत्न केला आहे. पण पटकथेची त्यांना उत्तम साथ असती, तर या भूमिका अधिक ठसठशीत झाल्या असत्या. हृषीकेश जोशीने यातली प्रभाकर पोस्टमनची भूमिका मात्र हातखंडा पद्धतीने साकारली आहे. राहुल जाधव यांचे छायांकन चांगले झाले आहे. बाकी अजून विशेष काही नाही. आकर्षक कव्हर पाहून एखादे गोष्टीचे पुस्तक विकत घ्यावे, पण ते उघडून वाचायला घेतल्यावर आतली काही पाने चक्क कोरी निघावीत, असे काहीसे या चित्रपटाचे झाल्याचे जाणवत राहते.