Join us  

सेल्फी- पारदर्शी रंगांचा आरपार कोलाज!

By admin | Published: November 22, 2015 12:10 PM

सेल्फी या नाटकाने केवळ वरवरच्या फोटोसेशनपुरते मर्यादित न राहता त्याही पलीकडे जात, व्यक्तींच्या अंतर्मनाचा तळ धुंडाळणा:या आणि मनात आरपार घुसणा:या पारदर्शी रंगांचा कोलाज सादर केला आहे

तिसरी घंटा - राज चिंचणकर
सध्याच्या युगात सेल्फी हा शब्द सर्वाच्याच अंगवळणी पडला आहे. आपणच आपला काढलेला फोटो, असा अर्थ घेऊन अवतरलेला हा प्रकार म्हणजे सवयीचा भाग बनला आहे. आता अगदी याच शीर्षकाचे नाटक आहे म्हटल्यावर ते  सेल्फीमय असणार हे गृहीतच धरायला हवे. पण या सेल्फीने केवळ वरवरच्या फोटोसेशनपुरते मर्यादित न राहता त्याही पलीकडे जात, व्यक्तींच्या अंतर्मनाचा तळ धुंडाळणा:या आणि मनात आरपार घुसणा:या पारदर्शी रंगांचा कोलाज सादर केला आहे.
रेल्वे स्टेशनवरच्या लेडिज वेटिंग रूममध्ये योगायोगाने एकत्न आलेल्या पाच स्त्रियांची ही गोष्ट आहे. व्यक्ती तशा प्रवृत्ती, या उक्तीनुसार या पाचही जणींचे स्वभाव भिन्न आहेत. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने त्यांना या रूममध्ये थांबणो अपरिहार्य झाले आहे. वेळ मोकळा मिळाल्याने साहजिकच या पाच जणींमध्ये संवाद घडत जातो आणि त्यातून त्यांचे भावविश्व समोर येत जाते. या पाच जणींमध्ये वयाने मोठय़ा असलेल्या स्वाती कवठेकर या वास्तविक नर्स आहेत, पण त्यांच्या अंगात शिक्षिकेची कडक शिस्त भिनलेली आहे. कुणाचीही भिस्त न बाळगता थेट बोलणो हा त्यांचा स्वभाव आहे. तर आपण ठरवून मुलाला जन्म न दिल्याचे सांगणारी, पण मनातून अस्वस्थ असणारी विभावरी जोगल ही युवा प्राध्यापिका आहे. तनुजा शर्मा ही सर्वसाधारण गृहिणी वाटणारी, पण दोन लग्ने झालेली स्त्नी आहे. मिनाक्षी ही टीव्ही चॅनेलमध्ये काम करणारी, पण हवा तसा जोडीदार न मिळाल्याचे शल्य उरी बाळगत जगणारी पस्तिशीची स्त्नी आहे. शाल्मली प्रधान ही गरोदर असलेली अभिनेत्नी आहे आणि हे मूल तिच्या करिअरमध्ये अडसर ठरू शकेल म्हणून ती गर्भपात करायला निघाली आहे. या पाच जणींनी एकमेकींशी साधलेला संवाद म्हणजे  सेल्फी हे नाटक आहे. त्यांच्या मनातल्या बिंब-प्रतिबिंबाचा खेळ या नाटकात मांडला आहे.
शिल्पा नवलकर या मूळच्या अभिनेत्नीने या  सेल्फीचे लेखन केले आहे आणि त्यांच्या लेखनाचा हा प्रथम  प्रयोग चांगलाच रंगला आहे. स्त्नी-लेखिकेचीच दृष्टी नाटकाला मिळाल्याने यातल्या स्त्नी-पात्नांची मनोवस्था अचूक उमटण्याला पाठबळ मिळाले आहे. त्यांच्या संहितेतले प्रवाहीपण आणि भाषेतल्या ओघवतेपणामुळे यातल्या नाटय़ाचा पाया अधिक मजबूत झाला आहे. दिग्दर्शक अजित भुरे यांनी हे नाटक बांधताना संहितेतल्या गांभीर्याला हलकेफुलके करण्याचा केलेला प्रयत्न लक्षवेधी आहे. त्यामुळे करमणुकीच्या पातळीवरही नाटक खेळते राहिले आहे. नाटकात एकच स्थळ असताना, पात्नांना रंगमंचावर सतत फिरते ठेवण्याचे नेटकेपण त्यांच्या दिग्दर्शनात आहे आणि त्यानुसार पाच पात्नांचा रचनाबंध त्यांनी ठोस सादर केला आहे.
सर्वसाधारणपणो दिवाणखान्यात अडकलेल्या नाटकाला या सेल्फीने मात्न त्यातून बाहेर काढत चाकोरीबाहेरचे स्थळमाहात्म्य बहाल केल्याने आपसूकच नाटकात वेगळेपण आले आहे. रेल्वेची ही वेटिंग रूम नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांनी भन्नाट उभी केली आहे. वेटिंग रूममधल्या प्रॉपर्टीचा बारीकसारीक केलेला विचार तिला वास्तव स्वरूप प्रदान करते. 
सुकन्या कुलकर्णी (स्वाती कवठेकर), विभावरी जोगल (सोनाली पंडित), तनुजा शर्मा (शिल्पा नवलकर), ऋजुता देशमुख (मिनाक्षी), शाल्मली प्रधान (पूर्वा गोखले) या पाचही जणींनी हे नाटक उत्तम पेलले आहे. टीमवर्कचा चांगला नमुना म्हणूनही हे नाटक बाजी मारून जाते.  सेल्फी  काढताना प्रत्येक वेळी फोटो अचूक येतोच असे नाही आणि त्यामुळे तो पुन: पुन्हा काढण्याची वृत्ती बळावत जाते. पण या नाटकाच्या बाबतीत मात्न त्याची आवश्यकता नाही. कारण या नाटकाने पहिल्याच फटक्यात घेतलेली अचूक उडी लक्षात घेता असा  सेल्फी  पुन्हा काढण्याची गरजच पडणार नाही.