- प्रफुल्ल गायकवाड
मुंबई, दि.८ - श्रेष्ठ उर्दू कवी आणि लोकप्रिय हिंदी गीतकार साहिर लुधियानवी यांची आज (८ मार्च) जयंती. त्यांचे मूळ नाव अब्दुल हाई. ‘साहिर लुधियानवी’ या टोपण नावाने त्यांनी गीतलेखन केले. लुधियाना (पंजाब) येथील एका मुस्लिम गुज्जर जमीनदार घराण्यात ८ मार्च १९२१ रोजी त्यांचा जन्म झाला. पंजाबी ही त्यांची मातृभाषा असली तरी गीतलेखन मात्र उर्दू व हिंदी भाषांत केले. त्यांचे वडील फाझल मुहम्मद हे इंग्रज राज्यकर्त्यांशी पूर्ण निष्ठा बाळगून होते; त्यांचा स्वभाव विलासी व स्वछंदी होता. साहिरांची आई सरदार बेगम ही त्यांची अकरावी पत्नी. ती अत्यंत स्वाभिमानी होती. आपल्या पतीची जीवनशैली तिला मान्य नव्हती. पतिपत्नीमधील ताणतणाव अखेर विकोपाला जाऊन त्यांनी परस्परांपासून फारकत घेतली. त्या वेळी बाल्यावस्थेत असलेल्या साहिरांचा ताबा न्यायालयाने त्यांच्या आईकडे दिला. ह्या घटनांचा व तणावपूर्ण कौटुंबिक वातावरणाचा साहिरांच्या मनावर खोल विपरीत परिणाम झाला आणि तो आयुष्याच्या अखेरपर्यंत टिकून राहिला. आर्थिक विवंचना, सततचे भय व दु:ख अशा वातावरणात साहिरांची जडणघडण झाली. त्याचे तीव्र पडसाद त्यांच्या काव्यातूनही उमटलेले दिसतात. एका कवितेत त्यांनी म्हटले आहे की, ‘माझा भूतकाळ काळोखातच गाडलेला राहू द्या. त्यात मानहानीखेरीज दुसरे काही नाही’. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी लुधियानाच्या शासकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला; तथापि साम्यवाद्यांचे नेतृत्व करणाऱ्या ‘ऑल इंडिया स्टूडन्ट्स फेडरेशन’ ह्या विद्यार्थी संघटनेतील त्यांचा सक्रिय सहभाग, तसेच खेडोपाडी जाऊन तेथील शेतकऱ्यांना आंदोलनास प्रवृत्त करण्यासारख्या त्यांच्या कृती, ह्या महाविद्यालयाला मान्य नसल्याने त्यांची त्या महाविद्यालयातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर लाहोरच्या ‘दयाळसिंग कॉलेजा’त त्यांनी प्रवेश घेतला; परंतु तेथूनही त्यांना ह्याच कारणास्तव बाहेर पडावे लागले; मात्र त्यांनी बी.ए. ही पदवी प्राप्त केली. गोरगरीब, पददलित व शोषित समाजाच्या दु:खमय आयुष्याबद्दल साहिरांना कणव होती. ही कणव, शोषितांची दु:खे, संघर्ष व अभावग्रस्तता यांचे चित्रण त्यांच्या काव्यातूनही येते. ह्या जाणिवेतूनच ते राजकीय स्वरुपाचे कामही करु लागले. त्याच वेळी एकीकडे त्यांचे काव्यलेखनही चालू होतेच. अदब-इ-लतिफ (लाहोर), सवेरा (लाहोर), शाहकार (दिल्ली) अशा काही नियतकालिकांच्या संपादनाचे कामही त्यांनी काही काळ केले; तथापि बराच काळ त्यांना बेकारीत घालवावा लागला. जमीनदाराच्या घरात जन्म घेऊनही त्यांनी पत्करलेल्या जीवनक्रमामुळे त्यांना कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागत होते. नोकरीच्या शोधात त्यांना दिल्ली, मुंबई, हैदराबाद अशा अनेक ठिकाणी हिंडावे लागले. ह्या भटकंतीत त्यांना अनेक कटू अनुभव आले. ‘ह्या दुनियेने आपत्तींच्या रुपाने मला जे काही दिले, तेच मी माझ्या कवितेतून परत करीत आहे’, असे त्यांनी आपल्या एका कवितेत म्हटले आहे. अनेक अडचणी सोसल्यावर साहिर मुंबईला आले आणि हिंदी चित्रपटांसाठी गीते लिहू लागले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. शेकडो गीते त्यांनी लिहिली. त्यांपैकी प्यासा (१९५७), नया दौर (१९५७), धूल का फूल (१९५९), बरसात की रात (१९६०), फिर सुबह होगी, वक्त, ताजमहाल, हम दोनो (१९६१), गुमराह (१९६३), चित्रलेखा (१९६४), कभी कभी (१९७६) इ. चित्रपटांतील त्यांची गीते रसिकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरली. त्यांना सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून दोन वेळा ‘फिल्मफेअर’चे पुरस्कार मिळाले : ताजमहाल चित्रपटातील ‘जो वादा किया’ या गीतासाठी १९६४ मध्ये आणि कभी कभी चित्रपटातील ‘कभी कभी मेरे दिल में’ या गीतासाठी १९७७ मध्ये. गायक व संगीतकार यांच्या बरोबरीनेच चित्रपटगीतकारांनाही सन्मान, प्रतिष्ठा व स्वामित्वशुल्क मिळावे, यासाठी साहिर यांनी अविरत लढा दिला व गीतकारांना चित्रपटव्यवसायात प्रतिष्ठा मिळवून दिली. भावोत्कटता हे त्यांच्या चित्रपटगीतांचे लक्षणीय वैशिष्ट्य म्हणता येईल. गाता जाए बंजारा हा त्यांच्या चित्रपटगीतांचा संग्रह प्रसिद्घ आहे. साहिर हे प्रागतिक विचारांचे कवी होते. आपल्या चित्रपटगीतांबद्दल त्यांनी म्हटले आहे की, ‘मी माझी चित्रपटगीते सर्जनशील कवितेच्या जवळ आणण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे; तसेच आधुनिक, सामाजिक आणि राजकीय मतप्रणाली सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांचा वाहन म्हणूनही उपयोग केला आहे’.
आपल्या विचारांवर साहिरांचा ठाम विश्वास होता. दारिद्र्य, शोषण, दु:ख ह्यांपासून मुक्त अशी सामाजिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी जागृती घडविण्याचा हेतू बाळगून त्यांनी आपली कविता लिहिली. ताजमहालवरील त्यांची कविता प्रसिद्घ आहे. 'ताजमहाल ज्यांनी आपल्या कष्टांनी घडविला, ज्यांच्या छिन्नीने ह्या इमारतीला सुंदर रुप दिले, त्यांनीही प्रेम केले असेल; पण त्यांना जे प्यारे, त्यांच्या कबरींची नावनिशाणीही शिल्लक नाही. एका शहेनशहाने दौलतीच्या जोरावर आम्हा गरिबांच्या प्रेमाची थट्टा केली आहे’, असे म्हणून साहिर ह्या कवितेतल्या प्रेयसीला म्हणतात, ‘तू मला ताजमहालाजवळ भेटू नकोस; कुठेतरी दुसरीकडे भेट’.
साहिरांच्या काव्यसंग्रहांत तल्खीयां (१९४४), परछाइयां (१९५५) आणि आओ के कोई ख्वाब बूनें (१९७३) ह्यांचा समावेश होतो. तसेच सम्राट (१९४५), तानिया (१९४५) ही अनुवादित पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. देवींद्र सत्यार्थी (१९४८) हे गद्य चरित्रही त्यांनी लिहिले.
साहिर यांना १९७१ मध्ये भारत सरकारने पद्मश्री प्रदान केली. याशिवाय ‘सोव्हिएट लँड-नेहरु पुरस्कार’ (१९७३) व ‘महाराष्ट्र उर्दू अकादेमी पुरस्कार’ (१९७३) देऊन त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला. २५ ऑक्टोबर १९८० साली त्यांचे निधन झाले.
सौजन्य : मराठी विश्वकोश