गायक शानने यंदा सर्व पालकांनी ‘नो स्मोकिंग’ हाच संकल्प करून आपल्या मुलांना नववर्षाची एक आगळी भेट द्यावी असं वाटतंय. शानच्या बालपणीच कँसरमुळे त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे लहानपणापासूनच ‘तंबाखूविरोधा’चा समर्थक असलेल्या शानने नेहमीच आपल्या आप्तेष्ठांना आणि सहकार्यांना तंबाखू उत्पादनांपासून दूर राहण्यासाठी आणि धूम्रपान न करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. आता दोन मुलांचा पिता असलेले शान सर्वच पालकांसाठी ‘नो स्मोकिंग’चा संदेश देणारे ‘नो स्मोकिंग पापा’ हे गाणे घेऊन आले आहेत.
गाण्याविषयी शान म्हणाला, "नो स्मोकिंग पापा पेक्षा जास्त चांगला नव्या वर्षाचा संकल्प काय असू शकतो? जर एकाही पित्याने आपल्या मुलांसाठी धूम्रपान करणे सोडले, तर ह्या व्हिडीयोचा उद्देश पूर्ण होईल असं मला वाटतं मग ते एक्टिव्ह स्मोकिंग असो की पॅसिव्ह स्मोकिंग दोन्हीचा आपल्या प्रकृतीवर दुष्परिणाम होतो. आणि आपल्या मुलांवर आणि कुटुंबावर प्रेम करणा-या प्रत्येक पालकाने ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी.”
निर्माते तुषार देसाई म्हणतात, “दोन वर्षांपूर्वी मी सतत धूम्रपान करायचो. पण माझ्या मुलाने अनुजने मला धुम्रपान सोडण्यासाठी प्रेरित केले. 'नो स्मोकिंग पापा' अनुजनेच पुढाकार घेतलेले प्रोजेक्ट आहे. आणि त्यासाठी सुप्रसिध्द गायक शानने आवाज द्यावा ह्यासारखी आनंदाची गोष्ट नाही. आणि मला पूर्ण विश्वास आहे की, ह्या व्हिडीओनंतर अनेक पालक आपल्या मुलांसाठी धूम्रपान करणे सोडतील."