कलाकार : तापसी पन्नू, विजय राज, शिल्पा मारवाह, इनायत वर्मा, समीर धर्माधिकारी, ज्योती सुभाष, देवदर्शिनी, बृजेंद्र काला, मुमताझ सरकारदिग्दर्शक : सृजित मुखर्जीनिर्माते : अजित अंधारेस्टार - तीन स्टारचित्रपट परीक्षण - संजय घावरे
आजवर बऱ्याच जणांनी जागतिक पातळीवरच नव्हे तर देश पातळीवरही महिला क्रिकेटला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम केलं आहे. भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजनं यासाठी वेळोवेळी पुढाकार घेतला. मितालीनं केलेला संघर्ष आणि तिची क्रिकेटर बनण्याची वाटचाल या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक सृजित मुखर्जी यांनी प्रेक्षकांसमोर सादर केली आहे, पण मितालीनं केलेल्या संघर्षाला न्याय देण्यात ते काहीसे कमी पडल्याचं चित्रपट पाहिल्यावर जाणवतं. तापसीकडूनही अपेक्षित काम झालेलं नाही.
कथानक : चित्रपटाची कथा भरतनाट्यम शिकणाऱ्या हैदराबादमधील लहानग्या मितालीपासून सुरू होते. नूरी नावाच्या समवयीन जीवलग मैत्रीणीसोबत ती क्रिकेटचे धडे गिरवू लागते. क्रिकेट कोच संपत यांची नजर मिथालीवर पडते. तिचं फुटवर्क आणि क्रिकेटबाबतचं नैसर्गिक टॅलेंट पाहून आश्चर्यचकित झालेले संपत मिथालीच्या घरी पोहोचतात आणि तिला क्रिकेट शिकण्यासाठी पाठवायला सांगतात. थोरल्या भावाऐवजी लहानगी मितालीच बाजी मारते आणि अतुलनीय कौशल्याच्या बळावर राष्ट्रीय संघापर्यंत झेप घेते. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधारही बनते. त्यानंतर महिला क्रिकेट संघाला आवश्यक सुविधा मिळण्यासाठी संघर्ष करते. मितालीचा महिला क्रिकेट विश्वचषकापर्यंतचा प्रवास यात दाखवण्यात आला आहे.
लेखन-दिग्दर्शन : प्रिया अवेन यांनी या चित्रपटाचं लेखन केलं असून, पटकथेची मांडणी आणखी घट्ट असणं गरजेचं होतं. मितालीनं जे साध्य केलंय ते मोठ्या पडद्यावर आणखी प्रभावीपणे सादर होणं अपेक्षित होतं. चित्रपट सुरू झाल्यापासून कथा मंद गतीनं पुढे सरकते. बालपणातील मितालीची दृश्ये खूप छान झाली आहेत. नूरी आणि मितालीतील मैत्रीचे पैलू चांगले आहेत. लहानग्या मितालीनंही सुरेख काम केलं आहे. हैदराबादसारख्या शहरातून येऊन भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदापर्यंतचा मितालीचा प्रवास प्रेरणादायी आहे. थोरला मुलगा क्रिकेट खेळत असताना धाकट्या मुलीलाही क्रिकेटसाठी प्रोत्साहित करणं हा मिथालीच्या आई-वडीलांचा गुण इतरांनी घेण्याजोगा आहे. क्रिकेटच्या सरावामध्ये बराच वेळ गेला आहे. त्या तुलनेत वर्ल्ड कप स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने घाईघाईत उरकण्यात आले आहेत. फुल क्रिकेटींग शॅाटस दाखवण्याऐवजी क्लाजेअपवर भर देण्यात आला आहे. मिताली आणि क्रिकेटऐवजी अन्य काही दाखवण्याचा मोह टाळण्यात आला आहे. चित्रपटातील गाणी कमी करून लांबी कमी करण्याची गरज होती. इतर तांत्रिक बाबी चांगल्या आहेत. महिला क्रिकेटप्रमाणं हा चित्रपटही एका दिग्गज महिला क्रिकेटरच्या जीवनप्रवासाला उचित न्याय देण्यात काही अंशी कमी पडल्याचं खेदानं म्हणावं लागतंय.
अभिनय : नेहमी धडाकेबाज दिसणारी तापसी पन्नू यात काहीशी वेगळी जाणवते. मितालीनं जे अचिव्ह केलंय त्याला न्याय देण्यात ती थोडीफार कमी पडली आहे. मितालीच्या रूपात अपेक्षित असलेली डॅशिंग तापसी चित्रपटात कुठेही दिसत नाही. बॉडी लँग्वेजवर आणखी काम करण्याची गरज होती. त्या तुलनेत मैत्रीणीची बिनधास्त भूमिका चांगली झाली आहे. विजयराजनंही खूप छान काम केलं आहे. समीर धर्माधिकारीनं वडीलांची, तर ज्योती सुभाष यांनी आजीची छोटीशा भूमिका चांगली केली आहे. शिल्पा मारवाह, इनायत वर्मा, देवदर्शिनी, बृजेंद्र काला, मुमताझ सरकार आदी कलाकारांनीही आपल्या वाट्याला आलेल्या भूमिकांना न्याय दिला आहे.
सकारात्मक बाजू : मितालीनं केलेला संघर्ष केवळ छोट्या शहरातील किंवा गावांतील मुलींना प्रेरणा देणारा नसून, डोळ्यांत मोठी स्वप्न आणि संघर्ष करण्याची जिद्द असणाऱ्या सर्वांसाठी प्रोत्साहित करणारा आहे.
नकारात्मक बाजू : चित्रपटाची लांबी आणि गती निराश करणारी आहे. महेंद्रसिंग धोनीसारखा चित्रपट पहायला मिळेल अशी अपेक्षा ठेवून जाणाऱ्या प्रेक्षकांना कंटाळा येईल.
थोडक्यात : या चित्रपटात जे सादर करण्यात आलंय त्यापेक्षा मितालीचं काम खूप मोठं आहे. ती एक भव्य-दिव्य चित्रपट डिझर्व्ह करते. असं असलं तरी एका प्रेरणादायी प्रवासाची संघर्षगाथा जाणून घेण्यासाठी हा चित्रपट एकदा तरी पहायला हवा.