अभिनेत्री आणि नवनिर्वाचित खासदारकंगना राणौतसोबत (Kangana Ranaut) चंदीगढ विमानतळावर विचित्र घटना घडली. CISF महिला सुरक्षाकर्मीने तिला कानाखाली मारली. शेतकरी आंदोलनावेळी कंगनाने केलेल्या एका वक्तव्याचा महिलेच्या मनात राग होता. या घटनेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी त्या महिलेची बाजूही घेतली आहे. पण शबाना आजमी (Shabana Azmi) यांनी मात्र आपण बाजू घेणाऱ्यांच्या गटात जाऊ शकत नाही असं ट्वीट केलंय.
कंगना राणौत आणि जावेद अख्तर यांच्यात बऱ्याच वर्षांपासून वाद सुरु आहे. इतकंच नाही तर त्यांच्यातील वादाचं प्रकरण कोर्टात आहे. दरम्यान आता कंगना खासदार झाली असून तिच्यासोबत झालेल्या घटनेवर जावेद अख्तर यांच्या पत्नी शबाना आजमी यांनी ट्वीट केलंय. त्या लिहितात,"माझ्या मनात कंगनाबद्दल अजिबातच प्रेम नाही. पण मी स्वत:ला त्या लोकांच्या गटात सामील करु शकत नाही जे कानाखाली मारल्याच्या घटनेचं समर्थन करत आहेत. जर सुरक्षाकर्मीच कायदा हातात घ्यायला लागले तर आपल्यापैकी कोणीच सुरक्षित राहू शकत नाही."
कंगनाला कानाखाली मारणाऱ्या महिलेचं नाव कुलविंदर कौर आहे. तिला आता निलंबित करण्यात आले आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान तिची आईदेखील आंदोलनात बसली होती. या महिलेला पैसे घेऊन आंदोलनाला बसल्या आहेत असं वक्तव्य कंगनाने केलं होतं. याचाच राग कुलविंदरच्या मनात होता.
एकीकडे मनोरंजनसृष्टीतून अनेक जण कंगनाच्या बाजूने उभे राहिले. रवीना टंडन, उर्फी जावेद,अनुपम खेर, अध्ययन सुमन, शेखर सुमन, अशोक पंडित यांनी या घटनेची निंदा केली. तर दुसरीकडे कुस्तीपटू बजरंग पुनिया, इतर काही खेळाडू, संगीतकार विशाल ददलानीने महिलेची बाजू घेतली आहे.