प्रसिद्ध अभिनेत्री शौकत आझमी यांचे काल संध्याकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी या त्यांच्या कन्या आहेत. शबाना आझमी यांचे पती जावेद अख्तर यांनी शौकत आझमी यांच्या निधनाविषयी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. त्या 93 वर्षांच्या होत्या. त्यांना बॉलिवूडमध्ये शौकत आपा अशी हाक मारली जात असे.
शौकत आझमी या गेल्या काही दिवसांपासून कोकिळाबेन धिरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल होत्या. पण त्यांच्या तब्येतीत काहीही सुधारणा होत नव्हत्या. त्यामुळे त्यांना घरीच आणण्यात आले होते. त्यांनी जुहू येथील त्यांच्या घरी शेवटचा श्वास घेतला. त्यावेळी त्यांच्या कन्या शबाना आझमी देखील घरी उपस्थित होत्या. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती जावेद अख्तर यांनी दिली आहे.
शौकत आझमी यांचे पती प्रख्यात कवी कैफी आझमी होते. कैफी आणि मी हे त्यांच्या आयुष्यावर पुस्तक रसिकांच्या भेटीस आले होते. शौकत आझमी यांनी उमराव जान, बाजार, हिर रांझा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. 2002 ला प्रदर्शित झालेला साथिया हा चित्रपट त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला. कैफी आझमी आणि शौकत आझमी हे दोघेही भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते. दोघेही इप्टा या सांस्कृतिक चळवळीत कार्यरत होते. शौकत कैफी यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत शोक व्यक्त करण्यात येत आहे.