Join us

बॉलिवूडचा 'रोमान्स किंग' शाहरुख खानने कोणत्या पद्धतीने केलं होतं गौरीशी लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 1:33 PM

शाहरुख खान आणि गौरी यांनी एकमेकांना डेट केल्यानंतर काही वर्षांनी एकमेकांशी लग्न केलं.

बॉलिवूडचा 'बादशाह' आणि 'किंग खान' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खानचे फॅन्स आहेत. आजही या वयामध्ये शाहरूख खान बॉलिवूडच्या फिट आणि हँडसम अभिनेत्यांना टक्कर देतो. लाखो तरुणींच्या हृदयावर राज्य करणाऱ्या शाहरुख खानला मात्र त्याचं प्रेम मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली होती. शाहरुख मुस्लिम तर गौरी हिंदू धर्माची असल्यानं अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागलं होतं. पण, धर्माच्या भिंती पाडून शाहरुखने गौरीशी लग्न केलं. पण, तुम्हाला हे माहितेय का शाहरुखने कोणत्या पद्धतीने गौरीशी लग्न केलं होतं. 

चित्रपट निर्माते विवेक वासवानी यांनी सिद्धार्थ कन्ननशी बोलताना शाहरुखच्या लग्नातील अनेक किस्से सांगितले. ते म्हणाले, 'शाहरुख-गौरीच्या विवाहसोहळ्यात मी उपस्थित होतो. शाहरुखने गौरीशी हिंदू आणि मुस्लीम परंपरेनुसार लग्न केलं. त्यानंतर त्यांनी पुन्हा नोंदणीकृत पद्धतीनेही लग्न केलं.अशा प्रकारे त्यांनी एकाच दिवशी तीन पद्धतीने लग्न केलं होतं'.  

पुढे ते म्हणाले, 'लग्नाआधी शाहरुख आमच्या घरी राहत होता. त्याचं लग्न झाल्यावर आम्हाला ‘राजू बन गया जेंटलमन’ चित्रपटासाठी एक शीर्षक गीत शूट करायचं होतं, म्हणून आम्ही सगळे गौरीला घेऊन दार्जिलिंगला गेलो होतो. शूटिंग संपल्यावर आम्ही मुंबईत परतलो. शाहरुख पुन्हा आमच्या घरी राहू शकत नव्हता. म्हणून मग शाहरुख-गौरी निर्माते अझीझ मिर्झा यांच्या एका अपार्टमेंटमध्ये राहायला गेले'.

 शाहरुख खान आणि गौरी खान हे इंडस्ट्रीतील सर्वात प्रेमळ आणि आनंदी वैवाहिक जोडपे मानलं जातं. दोघांच्या लग्नाला 32 वर्षे झाली आहेत. परंतु, त्यांच्या नात्याची क्रेझ आजही कायम आहे. प्रत्येक प्रेम कथांप्रमाणे शाहरुख आणि गौरीच्या प्रेम कथेतही काही चढ-उतार होते. या दोघांच्या प्रेमालाही अनेक अडचणी आल्या. परंतु, आजपर्यंत दोघांनीही एकमेकांची साथ सोडली नाही. ते दोघे आज आदर्श जीवन जगत आहेत. शाहरूख आणि गौरी यांना एक सुहाना ही मुलगी  तर आर्यन आणि अबराम ही दोन मुलं आहेत.

टॅग्स :शाहरुख खानसेलिब्रिटीगौरी खानसुहाना खानआर्यन खानबॉलिवूड