KGF आणि KGF 2 मधून देशातच नव्हे तर जगात खळबळ माजवणारा 'रॉकी भाई' अर्थात सुपरस्टार यशच्याबॉलिवूडमध्ये डेब्यूची चाहते वाट पाहत आहेत. नितेश तिवारीच्या 'रामायण' या चित्रपटात तो दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. यानंतर आता त्याचा दुसरा हिंदी प्रोजेक्ट चर्चत आला आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार यश आणि बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) हे लवकरच स्क्रिन शेअर करणार आहेत, असं म्हटलं जात आहे.
'KGF 2' या चित्रपटातून आपला ठसा उमटवणारा यशचे नाव एकामागून एक चित्रपटांशी जोडले जात आहे. रणबीर कपूरच्या 'रामायण'नंतर आता यश शाहरुखसोबत काम करण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या येत आहेत. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, यश त्याच्या पुढील चित्रपटासाठी शाहरुख खानची प्रॉडक्शन कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंटशी बोलणी करत आहे. चित्रपटाच्या कल्पनेवर चर्चा झाल्याचं समोर आलं आहे. यश आणि शाहरुख खान एका ॲक्शन चित्रपटात एकत्र दिसणार आहेत, मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
यश हा शाहरुखचा मोठा फॅन आहे. हे त्यानं अनेकदा सांगितलं आहे. पण, शाहरुखसोबत काम करण्यासाठी तो एका चांगल्या स्क्रिप्टची वाट पाहत आहे. कारण, दोन्ही सुपरस्टारच्या चाहत्यांना त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे ते चाहत्यांना निराश करु इच्छित नाहीत. दुसरीकडे यशच्या जवळच्या सूत्राने हे दावे फेटाळून लावले आहेत. सध्या यशला त्याच्याकडे असलेल्या प्रोजेक्ट्सवरच लक्ष केंद्रित करायचे आहे, असे त्यांनी म्हटलं आहे.
यश सध्या 'रामायण' सिनेमासाठी चर्चेत आहे. नितेश तिवारीच्या 'रामायण'मध्ये तो रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. यश जून किंवा जुलै 2024 मध्ये रामायणाच्या शुटिंगला सुरुवात करेल आणि 15 दिवसांत चित्रपटाच्या पहिल्या भागाचे वेळापत्रक पूर्ण करेल. 'रामायण: भाग एक'चे शूटिंग जुलैपर्यंत पूर्ण होईल आणि त्यानंतर निर्माते चित्रपटाच्या पोस्ट-प्रॉडक्शनवर दीड वर्ष घालवतील. KGF फ्रँचायझीच्या यशानंतर हिंदी प्रेक्षकांमध्ये यशचा एक मजबूत चाहता वर्ग आहे. याच कारणामुळे तो बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहे.