मुंबईतील अनेक प्रसिद्ध गणपतींपैकी एक म्हणजे 'लालबागचा राजा'. नवसाला पावणारा बाप्पा अशी ख्याती असणाऱ्या लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक गर्दी करत असतात. सेलिब्रिटींनाही या लाडक्या बाप्पाचं रुप डोळ्यात साठवण्याचा मोह आवरता येत नाही. मराठी कलाकारांप्रमाणेच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही लालबागचा राजाचं दर्शन घेतात.
बॉलिवूडचा किंग शाहरुख खानही लालबागचा राजा चरणी नतमस्तक झाला. किंग खानने कुटुंबीयांसह लालबागचा राजाचे दर्शन घेतले. गुरुवारी(२१ सप्टेंबर) शाहरुख छोटा लेक अबरामसह बाप्पाच्या दर्शनासाठी हजर होता. यावेळी त्याची मॅनेजर पूजा दादलानीही त्याच्या बरोबर होती. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
दरम्यान, शाहरुख खानचा 'जवान' नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पहिल्या दिवसापासूनच कोटींची कमाई करणाऱ्या 'जवान' चित्रपटाची सर्वत्र हवा आहे. या चित्रपटात शाहरुखबरोबर नयनतारा, दीपिका पदुकोण, विजय सेतुपथी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.