Join us

शाहरूख खान धमकी प्रकरणात मुंबई पोलिसांकडून कारवाई, 50 लाखांची मागितली होती खंडणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 12:33 PM

शाहरुख खानला अशी धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही.

Death threat to Shah Rukh Khan: बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान धमकी प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. रायपुरमधून एका संशयित व्यक्तीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.  या व्यक्तीने शाहरुखला जीवे मारण्याची धमकदी देत  50 लाख रुपयांची मागणीही केली होती.  फैजान खान असं संशयित व्यक्तीचं नाव असून त्याची चौकशी सुरू आहे. 

फैजान खानला मुंबई पोलिस जिल्हा न्यायालयात सादर केल्यानंतर त्याला लगेचच बांद्रा पोलिस ठाण्यात नेतील असं सांगण्यात येतंय.  शाहरुखला धमकी आल्यानंतर  पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. शाहरुखला धमकीचा कॉल छत्तीसगडमधील रायपूरमधून आल्याचं तपासात उघड झालं. रायपूरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक संतोष सिंह यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, फैजान खान हा एक व्यवसायाने वकील आहे. त्याची रायपूरमध्ये पोलिसांनी चौकशी केली. फैजानने 5 दिवसांपूर्वी म्हणजेच 2 नोव्हेंबर रोजी आपला फोन चोरीला गेल्याचे सांगितले होते.

शाहरुख खानला अशी धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्याला अंडरवर्ल्डकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्याच्यावर दबावही टाकण्यात आला, पण किंग खानने कोणतीही भीती न बाळगता त्या कठीण परिस्थितीचा सामना केला होता. 

बॉलिवूड इंडस्ट्रीत सध्या भीतीचं वातावरण आहे.  स्टार्सना सतत धमक्या येत आहेत.  अभिनेता सलमान खान लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या निशाण्यावर आहे. सलमान खान, शाहरुख खाननंतर ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्तींना पाकिस्तानातून धमकी आल्याचं प्रकरण समोर आलं. धमकी आल्यानंतर तिन्ही अभिनेत्यांच्या सुरक्षेत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे.   

टॅग्स :शाहरुख खानरायपूरपोलिसमुंबई