बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या आगामी 'डंकी' (Dunki) सिनेमामुळे चर्चेत आहे. 'पठाण' आणि 'जवान' नंतर तो आणखी एक ब्लॉकबस्टर हिट देण्यासाठी सज्ज आहे. नुकताच डंकीचा प्रमोशनल इव्हेंट दुबईत पार पडला. यावेळी शाहरुखने 'डंकी' नेमकी कशाची कहाणी आहे याचा खुलासा केला. तसंच शाहरुख स्वत:चेच चित्रपट पाहत नाही यामागचं नेमकं कारण काय हेही त्याने यावेळी सांगितलं.
दुबईत आयोजित 'डंकी'च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये शाहरुखने दिलखुलास संवाद साधला. बॉलिवूडचा बादशाह ज्याचे जगभरात चाहते आहेत तो स्वत:चेच चित्रपट पाहत नाही हे ऐकून चाहत्यांनाही आश्चर्य वाटलं. यामागचं कारण सांगताना शाहरुख म्हणाला,"आजकाल सोशल मीडियावर सगळे माझी मिमिक्री करतात. मला आजपर्यंत हे कळलं नाही की ककक किरण वाला डायलॉग मी असं कधी बोललो होतो. काही लोक तर फारच वाईट पद्धतीने माझी मिमिक्री करतात. आय लव्ह यू केकेके किरण. असं थोडीच असतं यार. मी असं तर बोललोच नव्हतो. सोशल मीडियावर हे सगळं पाहून मला माझेच चित्रपट पाहायला खूप विचित्र वाटतं."
शाहरुखने आपल्या मुलांची प्रतिक्रिया काय असते हेही सांगितलं. तो म्हणाला,'माझी तीन मुलं आहेत. मोठा मुलगा 26, मुलगी 23, आणि छोटा मुलगा 10 वर्षांचा आहे. मला आणि गौरीला दिल्लीतून मुंबईत स्थायिक होऊन ३०-३५ वर्ष झाली याची जाणीवच झाली नाही. इतकंच काय मला सिनेमात काम सुरु करुन 24 वर्ष झाली आहेत. ते दिवसही गेले जेव्हा मी मुलांना सांगायचो की या माझे चित्रपट बघा. आधी आधी तर ते माझी स्तुती करायचे. पण आता म्हणतात, बाबा तुमचे केस कसे दिसत आहेत? बघा तुम्ही किती विचित्र दिसत आहात?"
राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'डंकी' सिनेमा 21 डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. ही एक कॉमेडी-ड्रामा फिल्म आहे. यामध्ये तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इरानी यांचीही मुख्य भूमिका आहे.