२०२३मध्ये बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानने अनेक सुपरहिट सिनेमे दिले. 'पठाण', 'जवान'नंतर 'डंकी'मधून त्याने बॉक्स ऑफिसवर धमाका केला. 'डंकी' सिनेमाला हवं तितकं यश बॉक्स ऑफिसवर मिळालं नाही. 'पठाण' आणि 'जवान'च्या तुलनेत या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर फार कमाई करता आली नाही. पण, या सिनेमातून शाहरुखने प्रेक्षकांची मनं जिंकली. आता 'डंकी' ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला आहे.
व्हॅलेंटाइन डेला शाहरुखच्या चाहत्यांना मोठं सरप्राइज मिळालं आहे. हा सिनेमा रात्री १२वाजता ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे १५ फेब्रुवारीपासून शाहरुखचा 'डंकी' आता चाहत्यांना ओटीटीवर पाहता येणार आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅठफॉर्मवर हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे. याबाबत नेटफ्लिक्सकडून एक ट्वीटही करण्यात आलं आहे. "तुमची बॅग पॅक करा...जगभरात डंका गाजवल्यानंतर शाहरुखचा 'डंकी' आता घरी येत आहेय...डंकी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे," असं ट्वीटमध्ये म्हटलं गेलं आहे.
राजकुमार हिराणी दिग्दर्शित 'डंकी' हा सिनेमा २१ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला होता. आता दोन महिन्यांनी डंकी ओटीटीवर रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमात शाहरुख खानबरोबर विकी कौशल, तापसी पन्नू या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.