बॉलिवूड किंग शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता होती. सध्या सगळीकडे फक्त ‘जवान’ची चर्चा पाहायला मिळत आहे. या चित्रपटात शाहरुखचा नवा लूक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘जवान’च्या ट्रेलरमध्ये चाहत्यांना याची झलक पाहायला मिळाली. त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर शुक्रवारी(१ सप्टेंबर) ‘जवान’चं अॅडव्हान्स बुकिंग सुरू करण्यात आलं.
‘जवान’च्या अॅडव्हान्स बुकिंगला चाहत्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळाल्याचं चित्र दिसत आहे. अॅडव्हान्स बुकिंगमध्ये ‘जवान’ चित्रपटाचं एक तिकीट तब्बल २३०० ते २४०० रुपयांना विकलं जात होतं. एका तिकिटासाठी हजारो रुपये मोजावे लागत असतानाही शाहरुखच्या चाहत्यांनी माघार घेतलेली नाही. ‘जवान’ चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाच्या लाखो तिकिटांची विक्री झाली आहे. २२ तासांतच तब्बल २ लाख ७१ हजार १७६ तिकीटे विकली गेली आहेत. अॅडव्हान्स बुकिंगमधून ‘जवान’ चित्रपटाने प्रदर्शनाआधीच ८.९८ कोटींची कमाई केली आहे.
शाहरुखच्या ‘जवान’ने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’चा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमधून पहिल्या दिवशी ३.३९ कोटींची कमाई केली होती. अॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत शाहरुखच्या ‘जवान’ने भाईजानलाही मागे टाकलं आहे.
दरम्यान, ‘जवान’ चित्रपटात शाहरुखसह नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पदुकोण हे कलाकार असणार आहेत. मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओकही या चित्रपटात झळकली आहे. ‘जवान’ चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे. अटली कुमार दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.