बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) याचा लॉस एंजेलिसमध्ये अपघात झाला आहे. सध्या त्याच्या आगामी सिनेमाचं येथे चित्रीकरण सुरु असून सेटवर मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये शाहरुख जखमी झाला आहे. शाहरुखला दुखापत झाल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. इतकंच नाही तर त्याच्यावर एक शस्त्रक्रियाही करण्यात आली. याविषयी 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तामध्ये नमूद करण्यात आलं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शाहरुख लॉस एंजलिसमध्ये त्याच्या सिनेमाचं चित्रीकरण करत आहे. या सिनेमाचं चित्रीकरण सुरु असताना शाहरुखच्या नाकावर मोठा आघात झाला. ज्यामुळे त्याच्या नाकातून प्रचंड रक्त यायला लागलं. त्यानंतर त्याला तातडीने येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांच्या माहितीनुसार, काळजी करण्याचं कारण नाही. परंतु, नाकातील रक्त थांबवण्यासाठी त्यांना एक लहानशी सर्जरी करावी लागली आहे.
किंग खान भारतात आला परत
नाकाची सर्जरी झाल्यानंतर शाहरुखने थेट त्यांच मुंबईतलं घर गाठलं आहे. शुटिंग अर्ध्यावर सोडून तो भारतात परत आला आहे. शाहरुख एकाच वेळी अनेक प्रोजेक्टवर काम करत आहे. दरम्यान, लवकरच शाहरुखचा 'जवान' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसंच तो 'डंकी' आणि 'टायगर वर्सेस पठाण' या सिनेमातही दिसणार आहे.