बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत नुकतेच दुसऱ्यांदा आई-बाबा झालेत. मीराने एका गोंडस मुलाला जन्म दिला असून या मुलाचे नाव त्यांनी झेन असे ठेवले आहे. शाहिदनेच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या मुलाच्या नावाविषयी त्याच्या फॅन्सना सांगितले होते.
शाहिदने आजवर उडता पंजाब, पद्मावत, कमीने, जब वुई मेट यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले आहे. त्याचे फॅन फॉलोव्हिंग प्रचंड आहे. त्यामुळे आपल्या या लाडक्या अभिनेत्याच्या मुलासाठी त्याचे फॅन्स अनेक गिफ्ट त्याच्या घरी पाठवत आहेत. हे गिफ्ट पाहून त्याची पत्नी मीराला नक्कीच आनंद झाला आहे. पण त्याचसोबत तिने एक खूपच छान संदेश त्याच्या फॅन्सना दिला आहे. मीराने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट लिहिली आहे. तिने पोस्टमध्ये म्हटले आहे की, आमच्या लाडक्या झेनसाठी तुम्ही भेटवस्तू पाठवल्या आहेत, त्यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत. आम्हाला देवाने खूप काही दिले आहे, त्यासाठी आम्ही देवाचे नेहमीच आभार मानतो. पण या जगात अनेक लहान मुले अशी आहेत की, त्यांना काहीच वस्तू मिळत नाहीत. त्यामुळे आम्हाला या भेटवस्तू पाठवण्यापेक्षा ज्यांना खरंच गरज आहे, ज्यांच्याकडे या वस्तू नाहीत त्यांना या भेटवस्तू पाठवाव्यात आणि त्यांना देखील आनंद द्यावा.
शाहिदचे आणि मीराचे लग्न ७ जुलै २०१५ ला झाले. एक वर्षानंतर २६ आॅगस्टला त्यांच्या घरी मीशाचा जन्म झाला. झेन हे त्यांचे दुसरे अपत्य आहे. मीराची आई बेला, शाहिद कपूरचे वडील पंकज कपूर, भाऊ ईशान खट्टर झेनच्या जन्माच्या वेळी रुग्णालयात होते. शाहिद कपूर सध्या पालकत्वाच्या सुट्टीवर असून जास्तीत जास्त वेळ मुलांसोबत घालवत आहे. या सुट्टीमुळेच शाहिद कपूरने त्याच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण पुढे ढकलले आहे. शाहिद कपूर व मीरा राजपूत या दोघांचे अरेंज मॅरेज. शाहिद आणि मीराचे लग्न ठरले आणि अचानक मीरा चर्चेत आली होती. म्हणजे अगदी लग्नाच्या आधीपासूनच मीडियात तिने स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले.