दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या आगामी चित्रपटाला शाहीद कपूर रामराम ठोकणार असल्याची खबर आहे. या चित्रपटामध्ये रणवीर सिंगचा अवाजवी हस्तक्षेप शाहीदला मान्य नसल्याने तो नाराज झाला असल्याचे समजते. ‘पद्मावती’मध्ये रणवीर सिंग व दीपिका पादुकोण यांना जास्त वेटेज दिले जात असल्याचे सांगण्यात येते. भन्साळी शाहीदची भूमिका कमी करणार असल्याची देखील चर्चा आहे. आपला रोल कमी करण्यात येणार असल्याच्या चर्चेने शाहीद नाराज झाला असून त्याने हा चित्रपट सोडण्याचे ठरविले आहे. स्क्रिन शेअरिंग हेही शाहीदच्या या निर्णयाचे कारण मानले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,‘पद्मावती’च्या पोस्टरमध्ये केवळ दीपिकाचाच समावेश असावा, असा आग्रह रणवीरने धरला आहे. रणवीरच्या अशा वागण्याचा शाहीदला प्रचंड राग आला आहे. याचमुळे रणवीरचा हस्तक्षेप तुम्ही थांबवू शकत नसला तर मला हा चित्रपट सोडावा लागेल असा दम त्याने भन्साळींना दिला असल्याचे समजते. रणवीर सिंग यात अलाऊद्दीन खिल्जीची भूमिका करणार असून शाहीद राजा रतन सिंग म्हणजेच पद्मावतीच्या पतीची भूमिका साकारणार आहे. ता दीपिका पादुकोन राणी पद्मावतीच्या भूमिकेत दिसणार आहे.
शाहीद कपूरचा ‘पद्मावती’ला रामराम!
By admin | Published: October 10, 2016 2:56 AM