Sunny Deol Shahrukh Khan Reunite: बॉलिवूडमध्ये सध्या बऱ्याच अनपेक्षित घटना घडत आहेत. एकीकडे स्टारकिड्सची चर्चा आहे तर दुसरीकडे जुने कलाकार पुन्हा बॉलिवूड गाजवत आहेत. तर कोणी जुने मतभेद विसरुन पुन्हा गळाभेट घेत आहेत. मग ते सनी पाजी (Sunny Deol) आणि शाहरुख खान (Shahrukh Khan) का असेना. 'गदर 2'च्या (Gadar 2) यशानिमित्त आयोजित सक्सेस पार्टीत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. यावेळी चक्क सनी पाजी आणि शाहरुख खान गळाभेट करताना दिसले. 'डर' सिनेमावेळी झालेली भांडणं विसरुन दोघंही तब्बल ३० वर्षांनी पुन्हा एकत्र आले आहेत.
सनी देओल सध्या 'गदर 2' ला मिळालेलं यश एन्जॉय करत आहे. सिनेमाने ५०० कोटीचा टप्पा पार केला आहे. सनी देओल सध्या भलातच खूश आहे. कधीच कोणत्याही पार्टीत न दिसणाऱ्या सनीने स्वत:च संपूर्ण बॉलिवूडला 'गदर 2'च्या सक्सेस पार्टीचं निमंत्रण दिलं. सलमान खान, सारा अली खान, कार्तिक आर्यन, अजय देवगण, काजोल सह अनेक कलाकार यावेळी एकत्र दिसले. पण शाहरुखसोबतच्या गळाभेटीने सर्वांचंच लक्ष वेधलं. सनी देओलने अनेक वर्षांचे मतभेद विसरुन मैत्रीचा हात पुढे केला.
शाहरुख खानच्या आगामी 'जवान'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. दुबईच्या बुर्ज खलिफावर सिनेमाचा ट्रेलर झळकला. दुबईवरुन परत येताच शाहरुख खान विमानतळावरुन थेट सनी देओलच्या पार्टीत दाखल झाला. दोघांनी कॅमेऱ्यासमोर पोज दिली. त्यांच्या चेहऱ्यावर आनंदच दिसत होता. एकमेकांची गळाभेट घेत नंतर शाहरुख तिथून निघाला. हे दृश्य पाहून सिनेरसिकांना तर भलताच आनंद झाला आहे.
काय होता वाद?
१९९३ साली आलेल्या 'डर' सिनेमात सनी देओल आणि शाहरुख खानने एकत्र काम केले होते. यामध्ये शाहरुख खान खलनायक होता. सिनेमाचा नायक सनी देओल असूनही शाहरुखलाच जास्त फुटेज देण्यात येत होतं. यामुळे सनी देओल नाराज झाला होता. त्याने 'डर'च्या निर्मात्यांसोबत पुन्हा कधीच काम करणार नाही अशी शप्पथही घेतली होती.