Join us

बॉक्स ऑफिसवर शाहरुखच "बाहुबली"

By admin | Published: May 02, 2017 11:43 AM

प्रभासने आमीर आणि सलमानच्या चित्रपटांना धोबीपछाड दिली असली तरी शाहरुख खानच्या ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटाचा रेकॉर्ड तोडू शकला नाही

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - दिग्दर्शक एसएस राजामौली आणि प्रभास यांच्या बहुप्रतिक्षित "बाहुबली 2" चित्रपटाने फक्त दोन दिवसांमध्येच बॉक्स ऑफिसवर अक्षरक्ष: धुमाकूळ घातला आहे. सगळ्या रेकॉर्ड्सना अक्षरक्ष: पायदळी तुडवत बाहुबलीची वाटचाल सुरु आहे. रिलीज होण्याआधीच 500 कोटींची कमाई करणा-या बाहुबलीने कमाईच्या बाबतीत नवे रेकॉर्ड प्रस्थापित केले आहेत. मात्र बादशहा शाहरुख खानचा एका विक्रम मोडण्यात बाहुबली अयशस्वी ठरला आहे. 
 
"बाहुबली 2" च्या हिंदी आवृत्तीने पहिल्या दिवशी 41 कोटींची कमाई करत आमीर आणि सलमानच्या चित्रपटांना मागे टाकलं. मात्र यावेळी बॉलिवूडचा बादशहा शाहरुखच्या सिनेमावर मात करण्यात तो अपयशी ठरला. भारतात 6500 आणि जगभरातील किमान 9000 स्किन्सवर "बाहुबली 2" रिलीज झाला आहे.
 
सलमान खानच्या सुलतान चित्रपटाने पहिल्या दिवशी 36.54 कोटींची कमाई केली होती. तर आमीर खानच्या दंगल चित्रपटाने 29.78 कोटींचा गल्ला जमवला होता. बाहुबलीने आमीर आणि सलमानच्या चित्रपटांना धोबीपछाड देत 41 कोटींची कमाई करत नवा विक्रम केला. मात्र यावेळी शाहरुख खानच्या ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटाचा रेकॉर्ड तोडू शकला नाही. ‘हॅपी न्यू इयर’ने पहिल्या दिवशी 45 कोटींची कमाई केली होती. शाहरुखला मागे टाकण्यामध्ये बाहुबलीला चार कोटी कमी पडले असंच म्हणावं लागेल. 
 
चित्रपटाने पहिल्या दिवसापासून रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली होती. बाहुबलीने पहिल्याच दिवशी भारतात 121 कोटी आणि जगभरात 217 कोटींची कमाई केली. आपली घोडदौड सुरु ठेवत दुस-या दिवशीही चित्रपटाने भारतात 285 कोटी तर जगभरात 382 कोटींची कमाई केली.
 
बाहुबली द कन्क्लुजन’ने तीन दिवसात हिंदी भाषेत 128 कोटी रुपयांची कमाई केली. शुक्रवारी बाहुबली 2 ने पहिल्या दिवशी 41 कोटी, दुसऱ्या दिवशी 40.5 कोटी आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 46.5 कोटी रुपयांची कमाई तर चौथ्या दिवशी 35 कोटी कमावले. म्हणजेच पहिल्या चार दिवसात हिंदी भाषेत अंदाजे 160 कोटींपेक्षा अधिक कलेक्शन झालं आहे.
 
"बाहुबली : द बिगिनिंग हा सिनेमा 2015 मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतलं होतं. मात्र कटप्पाने बाहुबलीला का मारलं ?, या प्रश्नाचं उत्तर या सिनेमात अपूर्ण राहिलं. त्यामुळे या सिनेमाच्या सिक्वेलची सर्वांना उत्सुकता लागली होती.
 
 आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट "बाहुबली 2" हा सिनेमा तेलगु, तमिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये आज रिलीज झाला आहे. देशभरात या चित्रपटाच्या तिकिटांची किंमतही वेगवेगळी आहे. दिल्लीत, या चित्रपटाचं किंमत 2400 वर येऊन पोहोचली आहे. तर अमेरिकेत या चित्रपटासाठी चाहत्यांना 40 डॉलर मोजावे लागणार आहेत. या सिनेमाच्या हिंदी भागाची सर्व हक्क करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनतर्फे घेण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे.