ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - आयपीएलच्या सामन्यादरम्यान वानखेडे मैदानावर सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की आणि पदाधिका-यांना शिवीगाळ केल्याप्रकरणात अभिनेता शाहरुख खानला क्लीनचीट देण्यात आली आहे. शाहरुखने शिवीगाळ केल्याचा कोणताही पुरावा मिळाला नाही, असा अहवाल पोलिसांनी महानगर न्यायदंडाधिकाऱ्यासमोर सादर केला आहे.
२०१२ साली झालेल्या आयपीएलच्या सत्रात मुंबईतील वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्सचा सामना रंगला. मात्र सामन्यानंतर शाहरुख आणि सुरक्षा रक्षकांमध्ये वाद झाला होता. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सुरक्षारक्षकाने शाहरूखच्या मुलीला मैदानावर खेळण्यास सोडण्यास मनाई केली. त्यामुळे संतापलेल्या शाहरूखने सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की केली, तसेच त्यावेळी भांडण सोडवण्यासाठी आलेल्या एमसीएच्या पदाधिका-यांना शिवीगाळ केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. याप्रकरणी एका स्थामनिक कार्यकर्त्याने न्यायालयात तक्रार दाखल केली होती व मरिन लाइन्स पोलीस ठाण्यात शाहरूखविरूद्ध अदखलपात्र गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दिवंगत विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील समितीने शाहरूखला एमसीएचा परिसर व वानखेडेवर प्रवेश करण्यास ५ वर्षांची बंदी घातली होती.
याप्रकरणाच्या चौकशीदरम्यान शाहरूखने शिवीगाळ केल्याचा कोणताही पुरावा मिळाला नाही, असे पोलिसांनी अहवालात नमूद केल्याने शाहरूखला मोठा दिलासा मिळाला आहे.