ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 31 - बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि सिनेमाच्या सेटवरील अपघात हे समिकरण जुनंच आहे. अपघाताचा हा किस्सा दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या सिनेमाच्या सेटवरही घडला आहे.
आनंद एल राय यांच्या आगामी सिनेमा शुटिंग सुरू असताना सेटवर अपघात झाला. या अपघातात शाहरुख खान थोडक्यात बचावला आहे. यात दोन क्रू मेंबर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सेटवर ज्याठिकाणी शाहरुख बसला होता तेथे सीलिंगचा मोठा भाग कोसळला. यात शाहरुखला किरकोळ दुखापत झाली आहे. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. जखमी झालेल्या दोन क्रू मेंबर्सना उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.
अपघातामुळे सिनेमाचं शुटिंग थांबवण्यात आले आहे. मुंबईतील फिल्मसिटीमध्ये राय यांच्या सिनेमाचा सेट उभारण्यात आला होता.
दरम्यान, आनंद एल राय यांच्या आगामी सिनेमामध्ये शाहरुख व्यतिरिक्त कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांच्याही मुख्य भूमिका आहेत.