Join us

तुमच्या फार्म हाऊसचा एरिया किती? शक्ती कपूर यांच्या प्रश्नावर दादा कोंडकेंनी दिलं हटके उत्तर, म्हणाले -तुझी नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2023 4:30 PM

मराठी चित्रपटसृष्टीचे सुपस्टार असलेला या दिग्गज अभिनेत्याने  १९६९ साली भालजी पेंढारकर यांच्या ‘तांबडी माती’ या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले.

७० आणि ८० चे दशक गाजवणारा एक महान अभिनेता म्हणजे, दादा कोंडके. मराठी चित्रपटसृष्टीचे सुपस्टार असलेला या दिग्गज अभिनेत्याने  १९६९ साली भालजी पेंढारकर यांच्या ‘तांबडी माती’ या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. यानंतर सोंगाड्या, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, राम राम गंगाराम, बोट लावीन तिथे गुदगुल्या हे त्यांचे चित्रपट तुफान गाजलेत. निर्मिती क्षेत्रही त्यांनी गाजविले. त्यांची निर्मिती असलेला ‘सोंगाट्या’ हा चित्रपट लोकांनी डोक्यावर घेतला. यानंतर दादांनी 16 चित्रपटांची निर्मिती केली. विशेष म्हणजे, हे सर्व सिनेमे रौप्यमहोत्सवी ठरले. या विक्रमामुळे त्यांचे नाव गिनीज बुकातही नोंदले गेले. येत्या ८ ऑगस्टला ९१ वी जयंती आहे. यानिमित्ताने झी टॉकीज या वाहिनीवर “ज्युबिली स्टार दादा” हा दादांच्या ६  सुपरहिट सिनेमांचा सीझन ६ ऑगस्टपासून दर रविवारी सुरू होत आहे. दादांच्या अनेक आठवणींना कलाकार मंडळी उजाळा देत असताना हिंदी सिनेमातीलअभिनेते शक्ती कपूर यांनीही दादांची एक खास आठवण शेअर केली आहे. एक व्हिडिओ शेअर करत शक्ती कपूर यांनी दादांच्या अभिनयाचे तर कौतुक केले आहेच पण दादा एक माणूस म्हणून किती दिलदार होते यावरही त्यांनी मोहर उमटवली आहे. शक्ती कपूर या व्हिडिओत असं सांगत आहेत की, “दादांसोबत काम करायला मिळणं हे त्या काळात खूप काही शिकण्यासारखं होतं. मीदेखील यासाठी स्वतःला भाग्यवान समजतो. मी दादांसोबत ‘आगे की सोच’ या सिनेमात काम केलं. या सिनेमाचं शूटिंग दादांच्या फार्म हाऊसवरच सुरू होतं. मी सहज दादांना विचारलं की, या तुमच्या फार्महाउसचा एरिया किती आहे. दादांनी तेव्हा मला जे उत्तर दिलं ते ऐकून मी अवाक् झालो. दादा म्हणाले, तुझी जिथंपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत हे आपलंच फार्म हाऊस आहे. इतक्या मोठ्या जागेचा मालक माझ्यासमोर होता आणि त्याला अजिबात गर्व नव्हता. 

पुढे ते म्हणाले, आजकाल आपल्या संपत्तीचा डामडौल करणारी मंडळी पाहिली की मला दादांच्या त्या संवादाची आठवण येते. आम्ही जोपर्यंत त्या फार्म हाऊसवर शूटिंग करत होतो, तेव्हा दादांनी मला गावचं जेवण खायला दिलं आणि माझं मन तृप्त केलं . गावी रोज संध्याकाळी दादांकडे खूप लोक यायची. गावातील काही तरूण यायचे, म्हातारी माणसे यायची  आपल्या समस्या मांडायचे आणि दादा त्यांना मुक्त हस्ते मदत करायचे. दादांनी कधीही त्यांच्या दातृत्वाची दवंडी  पिटली नाही. ॲडव्हान्स इनकम टॅक्स भरणारे दादा कोंडके एकमेव कलाकार असतील. ते नेहमी ज्यादाची रक्कम टॅक्स भरून ठेवायचे जेणेकरून त्यावरून त्यांच्याकडे कुणी बोट दाखवू नये असे त्यांना वाटायचे. सध्या अशी माणसं देवाने बनवणं बंद केलय . एक अत्यंत काटेकोर, शिस्तबध्द आणि तितकेच संवेदनशील माणूस असलेल्या दादांनी मराठी सिनेसृष्टीला जे सिनेमे दिले आहे ते कधीच जुने होणार नाहीत इतका त्यात उत्साह आहे.” मराठी सिनेमाचे “शो मॅन” अशी ख्याती असलेल्या दादा कोंडके यांनी दोन दशके प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणाऱ्या सिनेमांची मेजवानी दिली. त्यापैकी ६ सुपरहिट सिनेमातून हास्याचे धबधबे ६ ऑगस्टपासून दर रविवारी दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता झी टॉकीजद्वारे प्रेक्षकांच्या  घरात कोसळणार आहेत. 

टॅग्स :दादा कोंडकेशक्ती कपूर