भुरे डोळे, कपाळावर रूळणारे केस, देखणा चेहरा म्हणजे शम्मी कपूर (Shammi Kapoor). आजहीशम्मी कपूर हे नाव घेतले की आठवते ते, चाहे कोई मुझे जंगली कहे... अशी आरोळी ठोकणारा, फ्रि स्टाईल डान्स करणारा, प्लेबॉय अशी इमेज असलेला एक बिनधास्त, बेभान अभिनेता. पृथ्वीराज कपूर यांच्या तीन मुलांपैकी शम्मी हे त्यांचे दुसरे अपत्य. आज (21 ऑक्टोबर) शम्मी कपूर यांचा वाढदिवस ( Shammi Kapoor Birthday). त्यांच्या वागण्या-बोलण्याची विशिष्ट ढब, नाच करतानाची अजब शैली यासारख्या गोष्टींमुळे शम्मी कपूर यांनी बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण केले होते. शम्मी कपूर यांना कधीच कोरिओग्राफरची गरज पडली नाही. ते स्वत:चे स्टेप्स स्वत: बसवत. त्यांच्या डान्सच्या अजब शैलीमुळे त्यांना डान्सिंग हिरो म्हणून ओळखले जात असे.
शम्मी कपूर यांचे खरे नाव शमशेर राज कपूर असे होते. शम्मी कपूर यांनी अभिनेत्री गीता बालीसोबत लव्ह मॅरेज केले होते. त्यांचे वडिल पृथ्वीराज कपूर यांचा या लग्नाला प्रचंड विरोध होता. गीता बालीचे कुटुंबही या लग्नाच्या विरोधात होते. दोन्ही कुटुंबाच्या विरोधामुळे दोघांनीही मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला. अर्थात या लग्नानंतर दोन्ही कुटुंबांनी लग्नाला संमती दिली. पण लग्नानंतर उण्यापु-या दहा वर्षांत गीता बाली यांचे निधन झाले. पत्नीच्या निधनामुळे शम्मी कपूर कोलमडून गेले होते. शम्मी गीता यांची दोन्ही मुले लहान होती. त्यामुळे कपूर कुटुंबाकडून शम्मी यांच्यावर दुस-या लग्नासाठी दबाव वाढला. पण शम्मी कपूर तयार होईनात.
याचदरम्यान ते अभिनेत्री मुमताजसोबत ‘ब्रह्मचारी’ चित्रपटाचे शूटींग करत होते. या चित्रपटाच्या सेटवर मुमताज आणि शम्मी यांच्यात जवळीक वाढली. सगळीकडे या अफेअरची चर्चा रंगली. अखेर शम्मी यांनी मुमताज यांना प्रपोज केले. त्यावेळी मुमताज 18 वर्षांची तर शम्मी तिच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठे होते. मुमताजने नुकतीच करिअरला सुरूवात केली होती आणि तिला बराच मोठा पल्ला गाठायचा होता. पण कपूर घराण्याच्या परंपरेनुसार, त्याकाळात स्त्रियांना अभिनय करण्यास मनाई होती. लग्नानंतर अभिनय सोडावा लागेल, ही शम्मी कपूर यांची अट मुमताजला मान्य नव्हती. त्यामुळे मुमताजने शम्मी यांचा प्रस्ताव धुडकावून लावला. हा नकार शम्मी कपूर यांना इतका लागला की, आता कुण्याच अभिनेत्रीशी लग्न करणार नाही, असे त्यांनी ठरवले. अर्थात पुढे काही वर्षानंतर कुटुंबाच्या दबावामुळे त्यांनी दुसरे लग्न केले. अर्थात एका अटीवर.
मुले लहान असल्याने घरच्यांनी शम्मी यांच्यावर दुस-या लग्नासाठी दबाव टाकणे सुरु केले. नीला देवीसोबत शम्मी यांनी लग्न करावे, अशी कुटुंबीयांची इच्छा होती. पण शम्मी कपूर मानेनात. घरच्यांचा दबाव इतका होता की, अखेर शम्मी कपूर दुस-या लग्नासाठी तयार झालेत. पण काही अटींवर. होय, शम्मी यांनी नीला देवींसमोर काही अटी ठेवल्या. यापैकी पहिली अट कुठली तर अर्ध्या रात्री मंदिरात लग्न करण्याची.
होय, 1955 मध्ये बाणगंगा मंदिरात अर्ध्या रात्री गीता बालीसोबत लग्न केले होते, तसेच लग्न करायचे, ही त्यांची पहिली अट होती. दुसरी अट होती, नीला देवींनी कधीही आई न बनणे. नीला देवींनी या दोन्ही अटी मान्य केल्या. नीला देवी कधीच आई बनल्या नाहीत. शम्मी कपूर व गीता बाली यांच्या मुलांना त्यांनी आपलेसे केले.