Join us

शंकर महादेवन यांच्या हस्ते ‘यंग्राड’चे संगीत लाँच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 4:35 PM

शंकर महादेवन हे नाव मराठी चित्रपटसृष्टीसाठी काही नवीन नाही. ‘यंग्राड’च्या संगीत प्रकाशानंतर त्यांनी यातील गाण्यांचे आणि युवा संगीतकारांचे तोंडभरून कौतुक केले.

ठळक मुद्दे‘यंग्राड’चे संगीत युवा संगीत दिग्दर्शक हृदय गट्टानी आणि गंधार यांनी दिले आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मकरंद माने यांच्या बहुप्रतीक्षित ‘यंग्राड’चे संगीत प्रख्यात गायक आणि संगीत दिग्दर्शक शंकर महादेवन यांच्या हस्ते मुंबईत नुकतेच प्रकाशित करण्यात आले. यावेळी चित्रपटाचे संगीतकार हृदय गट्टानी, चित्रपटाचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मकरंद माने, निर्माते विठ्ठल पाटील आणि गौतम गुप्ता हेसुद्धा संगीत प्रकाशन समारंभाला उपस्थित होते.  

शंकर महादेवन हे नाव मराठी चित्रपटसृष्टीसाठी काही नवीन नाही. ‘यंग्राड’च्या संगीत प्रकाशानंतर त्यांनी यातील गाण्यांचे आणि युवा संगीतकारांचे तोंडभरून कौतुक केले. त्यांनी या चित्रपटातील ‘गोष्ट रामाची...’हे चित्रपटाची कथावर्णन करणारे गाणे गायले आहे. चित्रपट ६ जुलै २०१८ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.    

“चित्रपटातील कथा अधोरेखित करणारे गाणे गाताना मला खूप मजा आली. संगीत दिग्दर्शक युवा जोडीने खूपच चांगले संगीत चित्रपटाला दिले आहे. हे संगीत लोकप्रिय होईल यात काही शंकाच नाही,” असे उद्गार महादेवन यांनी संगीत प्रकाशन दरम्यान काढले.   

‘यंग्राड’चे संगीत युवा संगीत दिग्दर्शक हृदय गट्टानी आणि गंधार यांनी दिले आहे. चित्रपटातील गाणी क्षितीज पटवर्धन, दत्ता पाटील आणि माघलुब पूनावाला यांनी लिहिली आहेत. यातील चार गाणी शंकर महादेवन, दिव्य कुमार, शाशा तिरुपती आणि हृदय गट्टानी यांनी गायली आहेत.  

वैविध्यपूर्ण कथा आणि आगळी हाताळणी यासाठी दिग्दर्शक मकरंद माने ओळखले जातात. ‘यंग्राड’ हा आणखी एका अशाच ‘हट के’ चित्रपट असून त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला.  

संगीत प्रकाशन समारंभानंतर बोलताना मकरंद माने म्हणाले, “शंकर महादेवन यांनी या चित्रपटातील एक महत्वाचे गाणे गायले असून त्यांनीच आज संगीत ही प्रकाशित केले, याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. युवा संगीतकार हृदय आणि गंगांधर यांनी उत्तम संगीत दिले आहे आणि ते रसिक डोक्यावर घेतील, अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे.”  

विठ्ठल पाटील (विठ्ठल पाटील प्रॉडक्शन्स), गौतम गुप्ता, गौरव गुप्ता (फ्युचरवर्क्स मिडिया लिमिटेड) आणि मधु मंतेना (फँटम फिल्म्स) यांनी संयुक्तरित्या या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चैतन्य देवरे, सौरभ पाडवी, शिव वाघ आणि जीवन करळकर या चार युवकांच्या मध्यवर्ती भूमिका या चित्रपटात आहेत. त्याशिवाय चित्रपटात शरद केळकर, सविता प्रभुणे  शिरीन पाटील, मोनिका चौधरी, शशांक शेंडे, विठ्ठल पाटील आणि शंतनू गणगणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  

‘यंग्राड’ हा बोलीभाषेतील प्रचलित शब्द असून तो भारताची दक्षिण काशी (दक्षिण बनारस) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये उनाड मुलांसाठी वापरला जातो. एखाद्याबरोबर भांडण उकरून काढणे किंवा मित्राला त्याच्या स्वप्नपरीबरोबर सुत जुळवायला मदत करणे यासाठी हे चारही मित्र नेहमीच एकमेकांच्या मदतीला धावून येत असतात. पण या संस्कारक्षम वयात चुकीचे आयडॉल समोर असल्याने हे चार युवक नेहमीच अडचणीत सापडतात. त्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर होतो आणि आपल्याला आयुष्याची सर्व माहिती आहे, अशा आविर्भावात वावरणारे हे चौघे एका क्षणी अशा निष्कर्षाला येतात की त्यांचे आयुष्यच विस्मरणात गेल्यासारखे होते. त्यानंतर मग ते स्वत्वःचा शोध घेऊ लागतात आणि आयुष्याच्या नवीन प्रवासाला लागतात.

टॅग्स :शंकर महादेवन