अभिनयाच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टी गाजवणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे शरद केळकर. हिंदी मालिकांबरोबरच अनेक चित्रपटांतही विविधांगी भूमिका साकारून त्याने बॉलिवूडमध्ये जम बसवला. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या रोहित शेट्टीच्या इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये शरद केळकर दमदार भूमिकेत दिसला. यानिमित्ताने त्याने 'लोकमत फिल्मी'च्या 'पंचायत'मध्ये हजेरी लावली होती.
'इंडियन पोलीस फोर्स'च्या निमित्ताने शरद केळकरसोबत शिल्पा शेट्टी, रोहित शेट्टी आणि वैद्यही परशूरामी यांनी लोकमत फिल्मीला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत शरद केळकरने मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीमध्ये काम करतानाचा अनुभव सांगितला. "सिनेमात छोटी भूमिका असूनही तो प्रदर्शित झाल्यानंतर तुमचीच चर्चा जास्त असते, असं का?" असा प्रश्न शरद केळकरला विचारण्यात आला होता. याचं उत्तर देताना शरद केळकरने रोहित शेट्टीचं कौतुक करत मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील फरक सांगितला.
तो म्हणाला, "मी कामात माझे १०० टक्के देतो. तुम्ही इमानदारीने काम करा आणि जे तुम्हाला करायला सांगितलं आहे ते करा. मी जास्त विचार करत नाही. जसं सांगितलंय ते करतो. हेच माझं सिक्रेट आहे. मराठी इंडस्ट्रीत स्टार्स नाही, असं आपण म्हणतो. पण, कलाकारांना स्टार बनवणारे दिग्दर्शक आपल्याकडे नाहीत. (असं शरद रोहित शेट्टीकडे बोट दाखवून म्हणाला.) एक दिग्दर्शक तुम्हाला एका सीनमध्येही स्टार बनवतो. तो इंटेट मराठी इंडस्ट्रीत नाही. ही मराठी सिनेसृष्टीची कमतरता आहे."
रोहित शेट्टीचं दिग्दर्शन असलेली 'इंडियन पोलीस फोर्स' ही वेब सीरिज १९ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित झाली. या वेब सीरिजमध्ये शिल्पा शेट्टी, सिद्धार्थ मल्होत्रा, विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत आहेत . शरद केळकर या सीरिजमध्ये RAW एजेंटच्या भूमिकेत आहे.