‘२४’ या मालिकेच्या दुसऱ्या सिझनमध्ये अभिनेते शरद पोंक्षे एक महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. शरद पोंक्षे हे मराठी इंडस्ट्रीमधले एक मोठे नाव मानले जाते. त्यांनी काही दिवसांपूर्वी ‘मेरी आवाज ही पहचान है’ या हिंदी मालिकेत काम केले होते. त्यानंतर आता ते ‘२४’मध्ये काम करत आहेत. या मालिकेत ते एका राजकारण्याची भूमिका साकारत आहेत. ‘२४’सारख्या प्रसिद्ध मालिकेत काम करायला मिळतेय याचा शरदला प्रचंड आनंद झाला होता. पण नंतरच्या काळात तारखांमध्ये काही बदल झाल्यामुळे त्यांना चित्रीकरण करणे शक्य नव्हते. पण या भूमिकेला शरदच योग्य न्याय देऊ शकतात असे अजिंक्य देव यांचे म्हणणे असल्याने त्यांनी शरदच्या तारखांनुसार चित्रीकरण केले. अजिंक्यमुळेच या मालिकेत काम करता आले असे शरद सांगतात. शरद या मालिकेत एका पक्षाच्या प्रक्षप्रमुखाची भूमिका साकारत आहेत. त्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच पंतप्रधान त्यांच्या खुर्चीवर बसू शकतात. पण पंतप्रधानांना पाठिंबा काढून घेऊ अशी सतत भीती दाखवणारा हा नेता त्यांनी रंगवला आहे. राजकारणात या व्यक्तिला प्रचंड वजन आहे. पण याचे वैयक्तिक आयुष्य खूपच वेगळे आहे. त्याला पक्षाघात झालेला असून त्यामुळे तो चालू शकत नाही. व्हिलचेअरवर बसून तो त्याच्या पक्षाची सूत्रे हलवतो. पण या त्याच्या आजरामुळे तो आपल्या पत्नीला कोणतेही सुख देऊ शकत नाही. या मालिकेत अभिनेत्री अमृता खानविलकर शरद यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. या मालिकेत शरद आणि अनिल कपूर यांचे एकही एकत्रित दृश्य नाही. त्यांची अधिकाधिक दृश्य ही अनिता राज यांच्यासोबत आहेत. अनिता यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप चांगला असल्याचे ते सांगतात. चित्रीकरणादरम्यान त्या दोघांची खूपच चांगली ट्युनिंग जमली असल्याचेही ते सांगतात.
शरद पोंक्षे ‘२४’मध्ये
By admin | Published: May 13, 2016 1:43 AM