थर्डक्लास राजकारण! अभिनेते शरद पोंक्षे संतापले!!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 03:06 PM2019-11-24T15:06:38+5:302019-11-24T15:12:33+5:30
राजकीय सद्यस्थितीवर अभिनेते शरद पोंक्षे यांनी ‘थर्डक्लास राजकारण’ अशी धक्कादायक प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला.
शनिवारी देवेन्द्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्रात जणू राजकीय भूकंप आला. या भूकंपाची तीव्रता इतकी की, या धक्क्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच खळबळ माजली. महाराष्ट्राचे अख्खे राजकारण ढवळून निघाले. या संपूर्ण राजकीय सद्यस्थितीवर अभिनेते शरद पोंक्षे यांनी ‘थर्डक्लास राजकारण’ अशी धक्कादायक प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला. फेसबुकवर ‘थर्डक्लास राजकारण’ असे लिहित त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. केवळ इतकेच नाही एका मुलाखतीत बोलताना, यापेक्षा हुकूमशाही आणा, असेही ते म्हणाले.
लोकसत्ता आॅनलाईनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपला संताप बोलून दाखवला. एक सामान्य नागरिक व कलाकार म्हणून या राजकीय परिस्थितीकडे कसे पाहता, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना शरद पोंक्षे म्हणाले की, ‘ लोकशाहीने आपल्याला मतदानाचा अमूल्य अधिकार दिला आहे. आपण एका विशिष्ट अपेक्षेने विशिष्ट पक्ष वा नेत्यांना मतदान करतो. मात्र निकालानंतर केवळ सत्तेच्या लालसेपोटी परस्पर विरोधी विचारधारेचे पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असतील तर हा थेट लोकशाहीचा अपमान आहे. लोकांनी दिलेल्या जनादराचा आदर आहे. ही लोकशाही पूर्णपणे अपयशी ठरली असेच म्हणावे लागेल.’
भाजपाने जे केले ते घृणास्पद आहे. एवढ्या पहाटे लपूनछपून शपथ घेण्याची गरज काय होती? असा सवाल त्यांनी केला. हे सगळे राजकारण सामान्य माणसाची निराशा करणारे आहे. यापेक्षा या देशात हुकूमशाही आणावी. हा संपूर्ण तमाशा तरी त्यामुळे थांबेल, असेही शरद पोंक्षे म्हणाले.